“मी हात बघणारा अशोक खरात नाही, उद्या काय होणार हे सांगू शकत नाही” - छगन भुजबळ
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या शक्यतेबाबत मिश्कील उत्तर देत चर्चेला उधाण दिले आहे. दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांसोबत गॅस आणि इंधन पुरवठ्याबाबत बैठक झाल्यानंतर पत्रकारांनी त्यांना विचारलेल्या प्रश्नावर भुजबळ यांनी हे उत्तर दिले.
राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असल्याचे विचारले असता भुजबळ म्हणाले, “मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय पूर्णपणे मुख्यमंत्री महोदयांचा आहे. आमच्या पक्षातील मंत्रिपदाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्याकडे आहे. मी काय सांगणार?”
धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिपद मिळेल का, असा प्रश्न विचारला असता छगन भुजबळ यांनी मिश्कील उत्तर दिले. ते म्हणाले, “मी काही अशोक खरात नाही की हात बघून उद्या काय होणार हे सांगू शकतो?” भुजबळ यांच्या या उत्तराने पत्रकारांमध्ये हशा पिकला.
अर्थमंत्रीपद राष्ट्रवादीलाच मिळेल
अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थमंत्रीपद सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. या खात्याबाबत विचारले असता भुजबळ म्हणाले, “अर्थसंकल्पीय अधिवेशन संपले आहे. ते खाते आमच्याकडे येईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जी खाती होती, ती मिळणारच आहेत.”
सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन मंत्रिपदे रिक्त आहेत. धनंजय मुंडे यांच्याकडे असलेले अन्न व नागरी पुरवठा खाते सध्या छगन भुजबळ यांच्याकडे आहे. कृषी खात्यातील घोटाळ्याच्या आरोपातून क्लीन चिट मिळाल्यानंतर धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिपदासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले जाते. मात्र, भुजबळ यांनी याबाबत स्पष्ट भूमिका घेतली नाही.
भुजबळ यांच्या या मिश्कील उत्तराने राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे. मंत्रिमंडळ विस्तार कधी होतो आणि धनंजय मुंडे यांना पुन्हा संधी मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.