फलटण पंचायत समिती सभापतीपदाचा सस्पेन्स कायम; आठ विरुद्ध आठ जागांमुळे राजे-खासदार गटात प्रतिष्ठेची लढत
नशिब, डावपेच आणि राजकारणाचा तिहेरी सामना; फलटणमध्ये निंबाळकर विरुद्ध निंबाळकर लढत अटीतटीची
सातारा: सातारा जिल्ह्यातील अकरा पंचायत समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडीकडे आज सर्वांचे लक्ष लागले असताना, सर्वाधिक चर्चा आणि उत्सुकता आहे ती फलटण पंचायत समितीच्यासभापतीपदाच्या निवडणुकीची. कारण येथे बहुमताचा आकडा कोणत्याही बाजूने स्पष्ट झालेला नाही. राष्ट्रवादी-भाजप युतीकडे आठ तर शिवसेनेकडे आठ अशा प्रत्येकी आठ जागा असल्याने निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.
अटीतटीच्या झालेल्या या हाय व्होल्टेज निवडणुकीनंतर आता सभापतीपदाची लढत राजे गट विरुद्ध खासदार गट अशी झाली आहे. एका बाजूला माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, तर दुसऱ्या बाजूला माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार सचिन पाटील** यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.
फलटणमध्ये सभापतीपदासाठी नशिब, डावपेच आणि राजकारणाचा तिहेरी सामना पाहायला मिळणार आहे. सदस्यांची पळवापळवी, शेवटच्या क्षणापर्यंत चालणारे राजकीय डावपेच आणि वादाच्या शक्यतेमुळे ही निवडणूक केवळ निवडणूक न राहता राजकीय रणसंग्रामच ठरली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला निंबाळकर विरुद्ध निंबाळकर हा संघर्ष आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, या हाय व्होल्टेज सामन्यात नशीब कुणाच्या बाजूने उभे राहते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
तरडगावातील आगीची घटना:
दरम्यान, फलटण तालुक्यातील तरडगाव परिसरातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. काढणीला आलेले सुमारे पाच एकरातील गव्हाचे पीक भीषण आगीत जळून खाक झाले आहे. शेतात गव्हाच्या काड्या पेटवत असताना शेजारील शेतात उभ्या असलेल्या गव्हाच्या पिकाला झळ बसल्याने ही दुर्घटना घडली. या आगीत शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, जळालेल्या गव्हाच्या क्षेत्राचा पंचनामा करण्याची मागणी सुरू आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.