⚡ ब्रेकिंग News

विजांचा कडकडाट, गारांचा मारा; राज्यात अवकाळीचा कहर, बळीराजाचं मोठं नुकसान, शेतातली पिकं झाली आडवी

विजांचा कडकडाट, गारांचा मारा; राज्यात अवकाळीचा कहर, बळीराजाचं मोठं नुकसान, शेतातली पिकं झाली आडवी

नागपूर ते बीडपर्यंत धुमाकूळ; कांदा, गहू, हरभरा, आंब्यासह फळपिकांची मोठी हानी, शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नागपूरपासून सोलापूर, नाशिक, जळगाव, बुलढाणा, परभणी, जालना ते बीडपर्यंत अवकाळी पावसाचा तडाखा बसल्याने नागरिकांची धावपळ उडाली असून शेतकरी वर्ग मात्र मोठ्या संकटात सापडला आहे.

नागपूर : अचानक पावसाने हजेरी

नागपूर शहरातील काही भागात अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची दाणादाण उडाली. हवामान विभागाने पुढील दोन दिवस विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.

सोलापूर : वीजपुरवठा खंडित

सोलापूरमध्ये गुरुवारी मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. रात्री बारानंतर सुरू झालेल्या या पावसामुळे शहरातील अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला. उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी वीज नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

नाशिक : सिन्नरमध्ये जोरदार पाऊस

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर शहर आणि ग्रामीण भागात सायंकाळी अचानक हवामान बदलून जोरदार पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, तर काढणीला आलेल्या कांदा, गहू आणि हरभरा पिकांना मोठा फटका बसण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

बुलढाणा : फळपिकांना फटका

बुलढाणा जिल्ह्यातही वादळी पावसाने मोठे नुकसान केले असून संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर तुनकी परिसरात कांदा आणि गहू पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच मेहकर, लोणार आणि चिखली तालुक्यात गारपिटीसह झालेल्या पावसामुळे केळी, संत्रा, निंबू यांसारख्या फळपिकांसह रब्बी पिकांनाही मोठा फटका बसला आहे.

परभणी : आंब्यांची गळ

परभणी जिल्ह्यात पावसापेक्षा वादळी वाऱ्यांचा अधिक तडाखा बसला. पूर्णा तालुक्यातील धानोरा, काळे, पाथरी तालुक्यातील गुंज आदी भागांतील आंब्यांच्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणावर आंब्यांची गळ झाली आहे. झाडांवर केवळ फांद्या उरल्या असून यंदा गावरान आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जळगाव : काढणीला आलेली पिके जमीनदोस्त

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव तालुक्यातही वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. काढणीला आलेले गहू, मका, ज्वारी आणि बाजरी ही पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

जालना-बीड : गारांचा खच

जालना जिल्ह्यात गारपिटीसह मुसळधार पावसामुळे गहू, ज्वारी, हरभरा तसेच फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले आहेत. बीड जिल्ह्यातील डोंगरपट्ट्यात गारपीटीनंतर तब्बल दोन इंच गारांचा खच साचल्याचे चित्र समोर आले. गहू, ज्वारी, आंबा आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

एकूणच, अवकाळी पावसामुळे काढणीच्या उंबरठ्यावर असलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून “तोंडाशी आलेला घास हिरावला” अशी भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी राज्यभरातून जोर धरत आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...