सुनेत्राकाकी, पार्थ आणि जय यांनी काळजी घ्यावी, कारण...; अशोक खरात प्रकरणावरून रोहित पवारांची पोस्ट, नेमकं काय म्हणाले?
भोंदू बाबाचा अजित पवारांच्या विमान अपघाताशी संबंध?; अमोल मिटकरींनी केली सीडीआर तपासणीची मागणी
स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात याला महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून अटक केली असून, या प्रकरणामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर अडचणीत सापडल्या आहेत. दरम्यान, आता या भोंदू बाबाचे नाव अजित पवार विमान अपघात प्रकरणाशीही जोडले जात असून, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी खळबळजनक मागणी केली आहे. तर याच मुद्द्यावरून रोहित पवार यांनी केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.
रोहित पवार : नेमकं काय म्हणाले?
रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं आहे की, पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात भोंदुगिरीला स्थानही नाही आणि त्यावर कोणाचा विश्वासही नाही, परंतु आ. अमोल जी मिटकरी म्हणत असल्याप्रमाणे अजितदादांच्या सहयोग सोसायटी येथील निवासस्थानाच्या बाहेर केलेला जादूटोणा तसेच देवगिरी बंगल्याबाहेर नाशिकच्या भोंदूबाबाच्या माध्यमातून जादूटोणा झाल्याची समोर येत असलेली माहिती बघता हे प्रकरण खूपच भयंकर दिसते.
सुनेत्राकाकी, पार्थ आणि जय यांनी काळजी घ्यावी
नाशिकच्या भोंदूबाबाने हा जादूटोणा केला तर मग या भोंदूबाबाला भोंदुगिरीची सुपारी देणारे राजकीय राक्षस कोण? त्यांचा या राक्षसी महत्त्वाकांक्षेचा राजकीय हेतू काय होता? या काळात अजितदादांच्या बंगल्यावर भोंदू खरात याच्याशी जवळीक असणारे कोण कोण आले? २७ जानेवारी रोजी संबंधित लोक देवगिरीवर आले होते का? याचा तपास होणे गरजेचे आहे. मा. सुनेत्राकाकी, पार्थ आणि जय यांनी काळजी घ्यावी, कारण आजचं बेभरवशी राजकारण चांगलं राहिलेलं नाही, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
अमोल मिटकरी : काय म्हणाले?
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी नाशिकचा भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात संदर्भात खळबळजनक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये आमदार मिटकरी यांनी कॅप्टन खरात याचा 'व्हीएसआर कंपनी'च्या विमानासोबत एक फोटो ट्विट केला आहे. कॅप्टन खरात याचे 'व्हीएसआर कंपनी'चा मालक व्ही. के. सिंग यांच्याशी काही संबंध आहे काय?, याचा तपास करण्याची मागणी केली आहे. यासोबतच अजित पवारांच्या बारामती आणि मुंबई येथील निवासस्थानाबाहेर केलेल्या आघोरी पूजेशी कॅप्टन खरात याचा संबंध आहे का?, याचा तपास घेण्याची मागणी केली आहे. कॅप्टन खरातसंदर्भात चौकशीसाठी नियुक्त केलेल्या 'एसआयटी'ने या दृष्टीनेही तपास करावे, अशी विनंती आमदार मिटकरी यांनी सरकारकडे केली आहे. या तपासातून नक्कीच अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल महत्वाचे धागेदोरे मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
अशोक खरात प्रकरण : नेमकं काय?
अशोक खरात याच्याविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाणे येथे अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३५ वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. आरोपी अशोक खरात हा सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तो मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाल्यानंतर ‘कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट’ आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध झाला होता. अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जात असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले असून, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी अशोक खरातची पाद्यपूजा केल्याचा फोटो समोर आल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.