इन्स्टाग्राममधून बाहेर पडा, तुम्ही प्रश्न विचारू नये यासाठी करमणुकीत गुंतवून ठेवलं जात आहे : राज ठाकरे
मनसेच्या वर्धापनदिनानिमित्त शिवाजी पार्कवर जोरदार भाषण; 'महाराष्ट्र नेक्स्ट' वेबसाईटचे लोकार्पण, २७ विषयांवर जाणून घेतली जाणार लोकांची मते
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा २० वा वर्धापनदिन शिवाजी पार्कवर साजरा करण्यात आला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. लोकांनी प्रश्न विचारू नये यासाठी त्यांना सातत्याने करमणुकीत गुंतवून ठेवलं जात असल्याची टीका करतानाच, लोकांनी आधी इन्स्टाग्राममधून बाहेर पडावं, असं आवाहनही त्यांनी केलं.
करमणुकीच्या गटारगंगेत अडकवून ठेवलंय
आपल्याला आज करमणुकीमध्ये गुंतवून ठेवलं आहे. आयपीएल, चित्रपट आणि इतर माध्यमातून गुंतवून ठेवलं जातंय. त्यामुळे पहिल्यांदा इन्स्टाग्राममधून बाहेर पडा. तुम्ही गुंतवून राहिला तर सरकारला प्रश्न विचारू नये यासाठी हे सगळं आखलेलं आहे. हे फक्त भारतात नव्हे तर जगभरात सुरू आहे. सर्वसामान्य माणसांनी मोबाईलमध्ये, करमणुकीमध्ये अडकून राहावं, मग कुणीही विचार करणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
पूर्वी लोक रस्त्यावर यायचे, पण आता मोबाईलवर निषेध व्यक्त केला जातो आहे. माध्यमांची वाट लावून टाकली आहे. सरकारला विरोध केला तर जाहिराती बंद करू अशी धमकी दिली जाते. या अशा विचित्र परिस्थितीमध्ये देश अडकला आहे. या करमणुकीच्या गटारगंगेत वाहत जाऊ नका, असे आवाहनही त्यांनी केलं.
इराणला साथ द्यायला हवी होती
जो इराण इतकी वर्षे आपल्याला साथ देत होता, त्या इराणवर हल्ले होताना आपण त्यांना साथ द्यायला हवी होती. आपल्याला इराण तेल रुपयामध्ये देतो. पण खामेनी गेल्यानंतरही आपण आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी एकही निषेधाचं वक्तव्य केलं नाही. इराणने जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावर आपल्याला पाठिंबा दिला होता, पण आपण तो देश अडचणीत असतानाही त्यांना साथ दिली नाही. याचा भविष्यात आपल्याला त्रास नक्कीच होणार, अशी चिंता राज ठाकरेंनी व्यक्त केली.
राज्याच्या कर्जावर संतप्त भाष्य
आपल्याला तीन ट्रिलियन इकॉनॉमी करणार असं मुख्यमंत्री होतात. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना दोन लाख कोटी रुपये राज्यावर कर्ज होतं. आता राज्यावर ११ लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे. कुठे चाललोय आपण? असा संतप्त सवाल राज ठाकरेंनी विचारला. आपल्या राज्यात तीन वेळा कर्जमाफी झाली, पण शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्याही आपल्याच राज्यात होतात हे दुर्दैवी असल्याचंही ते म्हणाले.
महाराष्ट्र नेक्स्ट : नवीन वेबसाईट सुरू
भविष्यातील महाराष्ट्र घडवण्यासाठी नवीन योजना समोर आणत असल्याचे सांगत राज ठाकरे यांनी 'महाराष्ट्र नेक्स्ट' या नावाची नवीन वेबसाईट सुरू केली. या वेबसाईटवर मराठी आणि इंग्रजीचा पर्याय देण्यात आला असून, एकूण २७ विषयांवर लोकांची मते जाणून घेतली जाणार आहेत. यामध्ये शेतीपासून ते आरोग्य व्यवस्था, वाहतूक सुविधा अशा विषयांचा समावेश आहे. लोकांच्या ज्या कल्पना आणि विचार असतील ते सर्व या वेबसाईटवर टाकता येणार आहेत. एक नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी, राज्याला आकार देण्याचं काम घडवण्यासाठी योगदान द्या, असे आवाहन राज ठाकरे यांनी केलं.
महापुरुषांच्या कार्याचा गौरव
भाषणादरम्यान राज ठाकरेंनी महाराष्ट्रासाठी योगदान असलेल्या व्यक्तिमत्वांची यादी वाचवून दाखवली. छत्रपती शिवाजी महाराजांपासून शाहू महाराज, प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, वि. स. पागे, संघाचे हेगडेवार, वि. का. राजवाडे, बाबासाहेब पुरंदरे, रणजित मेहंदळे यांच्या नावांचा आणि कार्याचा गौरव केला. आपल्याकडे या महान लोकांच्या जयंत्या साजऱ्या केल्या जातात, पण त्यांचे विचार कधीही घेतले जात नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
आपण ही सत्ता घेणार : राज ठाकरे
आपण या ठिकाणी आहोत ते महाराष्ट्रासाठी आहोत. आपल्याला ही सत्ता भविष्यात हाती घ्यायची आहे आणि ती आपण घेणार म्हणजे घेणार, असा विश्वास राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.