मुंबई : विरोधकांच्या घरी शुभकार्याला जाण्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे. आदित्य ठाकरे यांनी मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला हजेरी लावल्यानंतर उपस्थित झालेल्या प्रश्नावर राऊत यांनी स्पष्टोक्ती दिली. तसेच, एकनाथ शिंदे यांनी शुभकार्याला बोलावले तर जाणार का, या प्रश्नावरही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
‘शुभकार्याला जाणे चुकीचे नाही’
संजय राऊत म्हणाले, “मुलीच्या बर्थडेला आदित्य ठाकरे उपस्थित होते हा दिल्लीतला विषय नाही. कोणी एखाद्या शुभकार्याला बोलावले असेल तर ते जाण्यामध्ये चुकीचे काहीच नाही. एखाद्याने शुभकार्याला पुढे बोलावले असेल तर तेवढ्यापुरती कटुता दूर ठेवून जर कोणी गेला असेल तर अशा प्रकारचे प्रश्न विचारणे किंवा बातम्या देणे मला योग्य वाटत नाही.”
राऊत पुढे म्हणाले, “ती काय राजकीय जागा नव्हती. त्या कौटुंबिक कार्यक्रमाला अनेक लोक उपस्थित होते. विरोधकांच्या घरी सुद्धा आम्ही अनेकदा गेलो आहोत. बाळासाहेब गेले आहेत, शरद पवार जातात. पण हे तेवढ्यापुरते असते. बाकी आमचा वैचारिक संघर्ष थांबत नाही.”
एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमाला जाणार का?
शिंदे यांनी शुभकार्यासाठी बोलावले तर जाण्याबाबत विचारल्यावर राऊत म्हणाले, “बोलवू द्या. त्यांच्याकडे आता कोणते शुभकार्य आहे असे मला दिसत नाही. कारण त्यांची सगळी कार्ये पार पाडली आहेत.”
प्रसाद लाड यांच्या शुभकार्याला उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावण्यावर राऊत म्हणाले, “ज्या प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनवर दगड मारण्याच्या अनुषंगाने विधान केले तिथे जाणे मला पटले नव्हते.”
भाजप आणि ठाकरे जवळ येत आहेत का?’ यावर काय म्हणाले?
भाजप आणि ठाकरे गट जवळ येत असल्याच्या चर्चांवर राऊत यांनी तीव्र भूमिका घेतली. ते म्हणाले, “भारतीय जनता पक्षाबरोबर आमचा संघर्ष आम्ही सुरू केला नसून हा संघर्ष त्यांनी २०१४ पासून सुरू केला. जसे इराणवर अमेरिकेने युद्ध लादले आणि इराण लढत आहे आणि अमेरिकेला माघार घ्यावी लागते, इस्रायलला माघार घ्यावी लागते, आम्ही त्या भूमिकेत आहोत.”
खासदार फुटण्याच्या चर्चा फेटाळल्या
खासदार फुटण्याच्या चर्चांना राऊत यांनी पूर्णपणे फेटाळून लावले. ते म्हणाले, “आमचे खासदार अजिबात फुटणार नाहीत. आमचे नऊ खासदार आहेत आणि शेवटपर्यंत नऊ खासदार पुढील निवडणूक होईपर्यंत राहतील.”
खासदार फोडण्याच्या पेरल्या जाणाऱ्या बातम्यांना त्यांनी ‘विकृती’ म्हटले आणि सत्ताधाऱ्यांना सुनावले, “तुमच्या खुर्चीखाली सुरुंग लागले ते आधी बघा. ते भाजपने लावले आहेत त्याच्यावर तुम्ही चिंतन केले पाहिजे.”
‘शिवसेना फिनिक्स पक्षाप्रमाणे झेपावेल’
महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेत असलेल्या दोन नेत्यांचा संघर्ष सुरू असल्याचे सांगत राऊत म्हणाले, “शिवसेना आहे त्या परिस्थितीमधून फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाशात झेपावताना तुम्हाला दिसेल. चिंता करू नये.”
दरम्यान, संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शुभकार्याला जाण्यापासून ते खासदार फुटण्याच्या चर्चांपर्यंतच्या सर्व मुद्द्यांवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.