मुंबई : जैन मंदिरांसाठी गॅस सिलेंडरची मागणी करणाऱ्या पत्रामुळे निर्माण झालेल्या वादावर राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एका व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी आपली बाजू मांडताना विरोधकांच्या टीकेला प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘माझ्याकडे मदत मागायला आलेल्या लोकांना गॅस सिलेंडर मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न केला तर काय चुकले?’ असा आर्त सवाल करत त्यांनी आपली जबाबदारी डावलू शकत नसल्याचे स्पष्ट केले.
‘हिंदू सणावेळी टीका करणे फॅशन झाली’
मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले की, “हिंदू सणाच्यावेळी आणि धार्मिक कार्यक्रमांवेळी टीका करायची ही एक फॅशन झाली आहे. माझ्यावर झालेली टीका त्याच नॅरेटिव्हचा भाग आहे. माझ्या मतदारसंघात रामनवमी, साई भंडारा, जैन धर्माचे कार्यक्रम यासारखे विशेष धार्मिक कार्यक्रम असतात. या कार्यक्रमांसाठी गॅसचा साठा नव्हता, त्यामुळे विशेष प्रयत्न करणे गरजेचे होते.”
‘जबाबदारीपासून पळ काढणार नाही’
लोढा पुढे म्हणाले, “माझ्याकडे साई भंडाऱ्याचे लोक आले होते, जैन धर्मीय लोक आले होते. त्यांना गॅस सिलेंडर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायचा नाही का? मी त्यासाठी प्रयत्न केला तर काही चुकले का? २ तारखेला हनुमान जयंती आहे, १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. या विशेष धार्मिक कार्यक्रमांसाठी मला प्रयत्न करावा लागणारच आहे. आमदार म्हणून ती माझी जबाबदारी आहे. कोणाला वाद निर्माण करायचा असेल तर त्याने करावा. मी जबाबदारीपासून पळ काढणार नाही.”
‘राज्यात गॅसचा तुटवडा नाही’
राज्यात गॅसच्या तुटवड्याबाबत बोलताना लोढा म्हणाले, “राज्यात गॅसचा तुटवडा नाही. राज्य सरकार चांगले काम करत आहे. फक्त विशेष धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी गॅस सिलेंडर मिळवायला प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे तेढ निर्माण करणे सोडा.”
मनसेचा आक्रमक विरोध कायम
दरम्यान, मंगलप्रभात लोढा यांच्या या पत्रावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घेतला आहे. मनसेने थेट गॅस पुरवठा करणाऱ्या एजन्सींना पत्र लिहून सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा मुद्दा उपस्थित केला आहे. तसेच, एका विशिष्ट समाजासाठी दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप करत गॅसचा काळाबाजार झाल्यास कठोर भूमिका घेण्याचा इशारा मनसेने दिला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यातही लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
लोढा यांच्या स्पष्टीकरणानंतरही हा वाद कायम असून, आगामी हनुमान जयंती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाला नवी उधाण येण्याची शक्यता आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.