स्पर्धा परीक्षा देणाऱ्या 464 तरुणांची जात प्रमाणपत्रे चोरून सभासद केल्याचा आरोप; केजमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातून एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. येथील दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीमध्ये मोठ्या फसवणुकीचा गुन्हा उघड झाला आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या आणि नोकरी करणाऱ्या तरुणांची जात वैधता प्रमाणपत्रे मिळवून, त्यांच्या संमतीशिवाय त्यांना गिरणीचे सभासद दाखवण्यात आल्याचे समोर आले आहे.
नेमके प्रकरण काय?
या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते अनिल कचरू तुरुकमारे यांनी केज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, गिरणीचे तत्कालीन लिपिक राजकुमार दयाराम वाव्हळे यांनी 2017 मध्ये जात पडताळणी समितीकडे माहिती अधिकारात अर्ज करून जानेवारी ते मार्च 2017 दरम्यान प्रमाणपत्रांसाठी अर्ज करणाऱ्या 464 अर्जदारांची कागदपत्रे हस्तगत केली. यामध्ये तक्रारदार तुरुकमारे यांचा मुलगा हृषिकेश याच्या प्रमाणपत्राचाही समावेश होता.
लिपिक वाव्हळे आणि गिरणीचे तत्कालीन अध्यक्ष विजयप्रकाश किसनराव ठोंबरे यांनी मिळून हे सर्व 464 जण त्यांच्या परवानगीशिवाय गिरणीचे सभासद असल्याची बनावट यादी तयार केली. ही यादी प्रादेशिक उपायुक्त, वस्त्रोद्योग (संभाजीनगर) यांच्या कार्यालयातून प्रमाणित करून शासनाची आणि विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यात आली.
प्रकार उघडकीस येताच कारवाई?
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर फसवणूक झालेल्यांनी संभाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर ठोंबरे यांनी हृषिकेश तुरुकमारे यांचे नाव यादीतून वगळले. मात्र, शेकडो विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांचा असा बेकायदेशीर वापर केल्याप्रकरणी पोलिसांनी विजयप्रकाश ठोंबरे आणि राजकुमार वाव्हळे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या घोटाळ्यामागचा नेमका हेतू काय होता याचा तपास सुरू आहे.
कोण आहेत विजयप्रकाश ठोंबरे?
विजयप्रकाश ठोंबरे हे केजच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांचे पती आहेत. 2017 मध्ये हा घोटाळा झाला तेव्हा संगीता ठोंबरे या भाजपकडून आमदार होत्या. काही दिवसांपूर्वीच त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला असून, त्या शिंदे सेनेच्या उपनेत्या म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे या प्रकरणामुळे बीडच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.