'अजितदादा असताना तटकरेंना कंटाळून राजीनामास्त्र उपसलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा गेम झाला; आता अमोल मिटकरींचा गौप्यस्फोट, म्हणाले, 'अजितदादांना घाईगडबड...''
पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आले आहेत. अजित पवार हयात असताना पक्षातील काही सेलच्या अध्यक्षांनी २६ जानेवारी रोजी पुण्यात आपला राजीनामा अजित पवार यांच्याकडे सोपवला होता. मात्र, अजित पवार यांनी हे राजीनामे मंजूर केले नव्हते. अजित पवार यांच्या निधनानंतर मात्र, हे राजीनामे पक्षाकडून कारणे न विचारता मंजूर करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी मोठे भाष्य केले आहे.
अमोल मिटकरी म्हणाले, "काही सेलच्या अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केल्याचे मला माध्यमांमधून समजले. त्यावेळी अजितदादांनी स्पष्टपणे सांगितले होते की, 'घाईगडबड करण्याची आवश्यकता नाही.' या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते; मात्र अजितदादांनी ते स्वीकारले नव्हते. भविष्यात ही बाब चिंताजनक ठरू शकते. मात्र, आता सुनेत्रा वहिनी (सुनेत्रा पवार) योग्य तो निर्णय घेतील आणि नाराज पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करून पक्षाला पुढे नेण्याचा प्रयत्न करतील, अशी आशा आहे."
नेमके प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी असलेल्या तीन पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यामध्ये मनोज व्यवहारे (असंघटित कामगार विभाग प्रदेशाध्यक्ष), सुभाष मालपाणी (उद्योग विभाग प्रदेशाध्यक्ष) आणि सचिन जाधव (मोटार मालक वाहतूक संघटना प्रदेशाध्यक्ष) यांचा समावेश होता. या तिघांनी २६ जानेवारी रोजी पक्ष कार्यालयात जाऊन अजित पवार यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला होता.
या पदाधिकाऱ्यांनी आपल्या राजीनाम्यात संघटनात्मक स्तरावर असमानता, न्यायाच्या तत्त्वांचा अभाव आणि वरिष्ठांकडून असहकार्य केले जात असल्याचा आरोप केला होता. विशेषतः प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली होती. त्या वेळी अजित पवार यांनी हे राजीनामे स्वीकारले नव्हते. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर हेच राजीनामे प्रदेश कार्यालयात पोहोचविण्यात आले आणि कोणतीही चौकशी न करता ते मंजूर करण्यात आले.
सुनील तटकरे यांचा पुढील निर्णय महत्त्वाचा
या घडामोडींमुळे पुन्हा एकदा सुनील तटकरे यांच्यावर नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. आता रिक्त झालेल्या विभागप्रमुखांच्या जागी नवीन नियुक्त्या कोण करणार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे याबाबत काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात सुरू असलेल्या या घडामोडींनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.