मॅट्रिमोनी साइटवरून बनावट प्रोफाइल्स तयार करून उच्चशिक्षित महिलांची फसवणूक; मुंबई, पुणे, नागपूरसह सहा ठिकाणी गुन्हे दाखल
नवी मुंबई : नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला असतानाच नवी मुंबईतून आणखी एक धक्कादायक फसवणुकीचे प्रकरण समोर आले आहे. स्वतःला ‘इस्त्रो’चा शास्त्रज्ञ, डॉक्टर आणि उच्चपदस्थ अधिकारी असल्याचे भासवून डझनभर महिलांचे लैंगिक आणि आर्थिक शोषण करणाऱ्या २१ वर्षीय आदर्श म्हात्रे याला पोलिसांनी अटक केली आहे.
केवळ दहावी पास, मात्र उच्चशिक्षितांची फसवणूक
केवळ दहावी पास असलेल्या या तरुणाची मोडस ऑपरेंडी थक्क करणारी आहे. आदर्श म्हात्रे याने मॅट्रिमोनी साइट्सवर १२ वेगवेगळ्या नावांनी बनावट प्रोफाइल्स तयार केली होती. उच्चशिक्षित आणि गलेलठ्ठ पगार असलेल्या महिलांना तो आपले लक्ष्य बनवायचा. तो कधी शास्त्रज्ञ, कधी डॉक्टर, तर कधी बँक अधिकारी असल्याचे सांगत असे.
अशी होती फसवणुकीची पद्धत
महिलांचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपीने खोट्या ओळखीची कागदपत्रेही वापरली. स्वतःचे राहणीमान उच्च ठेवून आणि लग्नाचे आमिष दाखवून तो महिलांशी जवळीक साधायचा. एकदा विश्वास निर्माण झाला की, तो त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवून लैंगिक शोषण करत असे. केवळ लैंगिक शोषणच नव्हे, तर अनेक महिलांकडून त्याने लग्नाचे कारण सांगून किंवा वैयक्तिक अडचणींचे निमित्त करून मोठी रक्कम उकळल्याचेही तपासात समोर आले आहे.
राज्यभरात गुन्ह्यांचे जाळे
आदर्श म्हात्रेचे कारनामे केवळ नवी मुंबईपुरते मर्यादित नसून, त्याच्याविरोधात नवी मुंबईसह मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, यवतमाळ आणि नागपूर या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पीडित महिलांच्या तक्रारींनुसार, हा तरुण अत्यंत सराईतपणे आपली ओळख बदलून महिलांची दिशाभूल करत असे.
पुणे पोलिसांकडून तपास सुरू
नवी मुंबई पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर या प्रकरणातील धागेदोरे पुण्यातही आढळले आहेत. त्यामुळे आता पुणे पोलिसांनी आरोपीचा ताबा घेतला असून अधिक तपास सुरू केला आहे. त्याच्या संपर्कात आणखी किती महिला होत्या आणि त्याने आतापर्यंत एकूण किती लाखांची फसवणूक केली आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.
अशोक खरातप्रमाणेच सामान्य नागरिकांची, विशेषतः महिलांची भावनांचा आणि विश्वासाचा गैरफायदा घेणाऱ्या या तरुणाने अनेकांच्या आयुष्यात अंधार ढकलल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी सखोल तपास सुरू केला असून, पीडित महिलांनी पुढे येऊन तक्रार द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.