ठळक बातम्या:
नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील ५ इमारतींमधील ८६४ सदनिकांचं वितरण
४२३ सदनिका पोलिस विभागातील निवृत्त, कार्यरत कर्मचारी व त्यांच्या वारसांना
१६० चौरस फुटांवरून ५०० चौरस फुटांच्या अत्याधुनिक २ बीएचके सदनिका; भूकंपरोधक तंत्रज्ञान
मुंबई: आशियातील नागरी पुनरुत्थानाच्या सर्वात मोठ्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत नायगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुलातील ८६४ पुनर्वसन सदनिकांचे वितरण आज (१६ मार्च) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यशवंतराव चव्हाण केंद्र, नरीमन पॉइंट येथे सकाळी १० वाजता हा सोहळा पार पडणार आहे.
पोलिस कर्मचाऱ्यांनाही लाभ
या ८६४ सदनिकांपैकी ४२३ सदनिका नागरिकांच्या सुरक्षेसाठी तत्पर असलेल्या पोलिस विभागातील निवृत्त पोलिस, त्यांचे वारस व कार्यरत पोलिस कर्मचाऱ्यांना वितरित करण्यात येणार आहेत. उर्वरित सदनिका इतर पात्र रहिवाशांना देण्यात येणार आहेत.
पिढ्यानपिढ्यांचं स्वप्न साकार
सुमारे दोन ते तीन पिढ्यांपासून १६० चौरस फुटांच्या खोल्यांमध्ये राहणाऱ्या पात्र रहिवाशांना आता म्हाडामार्फत ५०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त २ बीएचके स्वरुपातील सदनिका मालकी तत्त्वावर विनामूल्य देण्यात येत आहेत. व्हिट्रीफाईड टाइल्स, अॅल्युमिनियम फ्रेमच्या खिडक्या, ग्रॅनाइट स्वयंपाकाचा ओटा, अग्निरोधक यंत्रणा, ब्रँडेड प्लंबिंग फिटिंग्ज, भूकंपरोधक तंत्रज्ञान, दोन पॅसेंजर लिफ्ट, एक फायर लिफ्ट आणि सीसीटीव्ही यंत्रणा या सुविधा सदनिकांमध्ये देण्यात आल्या आहेत.
प्रकल्पाचे स्वरूप
नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प ६.४५ हेक्टर जागेवर तळ अधिक ३ मजल्यांच्या ४२ चाळींमध्ये ३३४४ भाडेकरू वास्तव्यास आहेत. दोन टप्प्यात राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पात २३ मजल्यांच्या २० पुनर्वसन इमारती उभारल्या जात आहेत. पहिल्या टप्प्यात प्लॉट 'ब' मधील १४०१ रहिवाश्यांचे पुनर्वसन करण्यात येणार असून, आज ५ इमारतींमधील ८६४ सदनिकांचे वितरण होत आहे. उर्वरित ५३७ सदनिकांचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून एप्रिल २०२६ मध्ये ते पूर्ण होणार आहे.
उपस्थिती आणि थेट प्रक्षेपण
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, नीलमताई गोऱ्हे, डॉ. पंकज भोयर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. लाभार्थ्यांसाठी हा कार्यक्रम म्हाडाच्या अधिकृत YouTube आणि Facebook चॅनलवर थेट पाहता येणार आहे. तसेच नायगाव येथील प्रकल्पस्थळी मोठ्या LED पडद्यावर हा सोहळा पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
बीडीडी प्रकल्पाची व्याप्ती
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत मुंबईतील वरळी, ना.म. जोशी मार्ग-परळ, नायगाव येथील सुमारे ८६ एकर जागेवर वसलेल्या १९५ चाळींचा समावेश असून १५ हजार ५९३ रहिवाशांचे पुनर्वसन केले जात आहे. यापूर्वी १४ ऑगस्ट २०२५ रोजी वरळी येथे ५५६ सदनिकांचे वितरण करण्यात आले होते.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.