ठळक बातम्या:
दुरुस्तीच्या कामामुळे अडीच महिन्यांपासून भाविकांसाठी बंद असलेले भीमाशंकर मंदिर भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यासाठी खुले
हेलिकॉप्टरने आलेल्या खासदारांना थेट व्हीआयपी दर्शन, सामान्य भाविकांना मात्र हजारो किलोमीटरची वारी करून परत जाण्याची वेळ
'महादेवाच्या मंदिरात दुजाभाव का?' प्रशासनाविरोधात भाविकांचा संताप
पुणे: बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिरात व्हीआयपी दर्शनावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. मंदिर दुरुस्तीच्या कामामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून सर्वसामान्य भाविकांसाठी मंदिर बंद आहे. मात्र, भाजपचे खासदार डॉ. निशिकांत दुबे यांच्यासाठी मात्र हेच मंदिर खुले करून त्यांना थेट व्हीआयपी दर्शन घडवून दिल्याने भाविकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
खासदारांसाठी सुविधा, भाविकांसाठी बंद दरवाजे
झारखंडच्या गोड्डा मतदारसंघातून चार वेळा निवडून आलेले खासदार निशिकांत दुबे हे हेलिकॉप्टरने भीमाशंकर मंदिरात पोहोचले. त्यांना विशेष परवानगी देऊन मंदिरात प्रवेश देऊन दर्शन घडवण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी ९ जानेवारी २०२६ पासून तीन महिन्यांसाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असताना ही कारवाई झाली आहे. सभामंडप आणि पायरी मार्गाच्या बांधकामासह भाविकांच्या सुरक्षेचे कारण देत मंदिर बंद ठेवण्यात आले असताना हजारो किलोमीटर पायी व सायकल वारी करून येणाऱ्या भाविकांना मात्र दर्शन न घेता परत जावे लागत आहे.
भाविकांचा संताप
'राजकीय नेत्यांसाठी मंदिर खुले आणि सर्वसामान्यांसाठी बंद का?', 'महादेवाच्या मंदिरात दुजाभाव का?' असा सवाल आता भाविकांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाच्या या भूमिकेवरून भीमाशंकर मंदिर प्रशासन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. महाराष्ट्रातील भाविकांना महाशिवरात्रीलाही शंकराचं दर्शन घेऊ दिलं नाही, पण भाजप खासदारासाठी मात्र नियम डावलल्याचा आरोप होत आहे.
काय आहे नियम?
मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद असले तरी श्री भीमाशंकराची नित्य पूजा, अभिषेक आणि धार्मिक विधी परंपरेनुसार नियमितपणे सुरू राहणार आहेत. मात्र या कालावधीत भाविकांना थेट दर्शन किंवा मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही, असे आदेश आहेत. बांधकाम यंत्रणा, अधिकृत अधिकारी-कर्मचारी आणि भीमाशंकर ग्रामस्थ वगळता अन्य कोणालाही मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले होते.
दरम्यान, भीमाशंकर मंदिराच्या स्थानावरूनही वाद सुरू आहे. महाराष्ट्रातील पुण्याजवळ सह्याद्री पर्वतावर असलेले हे सहावे ज्योतिर्लिंग असल्याची मान्यता असताना, आसाम सरकारने आपल्या राज्यातील भीमाशंकर हेच खरे ज्योतिर्लिंग असल्याचा दावा केला आहे. या दाव्यावरून महाराष्ट्रातील नेत्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.