इराणी वंशाच्या अभिनेत्रीने महिला दिनानिमित्त केले मोठे वक्तव्य; महिलांच्या स्वातंत्र्यावर भारताचे कौतुक
मुंबई : 'मस्ती 4' आणि 'जुग जुग जियो' सारख्या चित्रपटांमधून प्रसिद्धी मिळालेली अभिनेत्री एलनाझ नोरोझी हिने महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर एक मोठे वक्तव्य केले आहे. इराणमध्ये महिलांची साक्षरता जवळपास ९५ टक्के असूनही तेथील कठोर इस्लामिक कायद्यांमुळे महिलांना अनेक निर्बंधांना सामोरे जावे लागत असल्याचे तिने सांगितले. भारतासारख्या देशात महिलांना मिळणाऱ्या स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित करतानाच इराणमधील महिलांची दयनीय अवस्था तिने मांडली.
इराणमध्ये सरकारविरोधात बोललात तर...
एलनाझ म्हणाली, "मी केवळ ७.५ कोटी इराणी लोकांच्या भावना व्यक्त करत नाही, तर ज्यांचा आवाज दाबला गेला आहे त्यांच्या वतीने बोलण्याचा प्रयत्न करते आहे. इराणमध्ये सरकारविरोधात बोललात तर तुमचा आवाजच बंद केला जातो." तिचे कुटुंब अजूनही इराणमध्ये राहत असल्याने हा विषय तिच्यासाठी अत्यंत वैयक्तिक असल्याचे तिने स्पष्ट केले.
भारतातील महिलांच्या स्वातंत्र्याचे कौतुक
भारताबद्दल बोलताना ती म्हणाली, "भारतासारख्या देशात आपण राहतो, जिथे बोलण्याचं स्वातंत्र्य आहे आणि महिलांना आपले विचार व्यक्त करण्याची मोकळीक आहे. भारतात एखादी महिला बुरखा घालू शकते आणि इच्छा असेल तर शॉर्ट्सही घालू शकते. महिलांना स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा अधिकार असायला हवा." तिने पुढे सांगितले की, इराणमध्ये बालविवाह बंद व्हावेत, महिलांना फुटबॉल स्टेडियममध्ये जाऊन सामने पाहण्याची परवानगी मिळावी, महिलांना न्यायाधीश बनण्याची संधी मिळावी आणि वारसाहक्कात पुरुषांइतकेच अधिकार मिळावेत.
भारत माझं दुसरं घर
एलनाझने पुढे सांगितले की, एक दिवस इराण स्वतंत्र झाल्यावर ती आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी तिथे जाईल. मात्र त्यानंतर ती पुन्हा भारतात परत येईल. "भारत माझं दुसरं घर आहे. इथे मी सुरक्षित आणि आनंदी वाटते," अशा शब्दांत तिने भारताबद्दलचे प्रेम व्यक्त केले. इराणमधील महिलांच्या प्रश्नांवर तिने अनेकदा मोकळेपणाने भाष्य केले असून, त्यामुळे तिला टीकाही सहन करावी लागते.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.