क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - किरण देशमुख
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील टेंभूर्णीमध्ये गाडी पार्किंग करण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या तुंबळ हाणामारीत एका तरुणाचा चाकूने भोकसून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना टेंभूर्णी येथील नाळेवस्ती परिसरात घडली. नागनाथ मच्छिंद्र जाधव (वय ४१, रा. वेणेगांव, ता. माढा) असे मृत तरुणाचे नाव आहे. गुरुवारी (दि. १) रात्री १०:१५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, या प्रकरणी टेंभूर्णी पोलीस ठाण्यात दोन अनोळखीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नाळेवस्ती येथील सद्दाम पटवारी यांच्या घरासमोरील पार्किंगच्या जागेत गाडी लावण्यावरून सद्दाम पटवारी आणि संशयित आरोपी राज कदम यांच्यात वाद सुरू होता. हा वाद दिवसेंदिवस वाढत गेला आणि गुरुवारी रात्री तो विकोपाला गेला. या वेळी मध्यस्थी करत भांडण सोडवण्यासाठी नागनाथ जाधव हे मध्ये पडले. याचा राग आल्याने आरोपींनी नागनाथ यांना शिवीगाळ करत जमिनीवर पाडले आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
भांडण विकोपाला गेल्यानंतर दुसरा संशयित आरोपी समाधान चौधरी आणि सागर कुटे यांनी सोबत आणलेल्या चाकूने नागनाथ यांच्या पाठीवर व मांडीवर सपासप वार केले. यात गंभीर जखमी झाल्याने नागनाथ जाधव यांचा मृत्यू झाला. टेंभूर्णी येथील खासगी रुग्णालयात उपचार करून मृत नागनाथ जाधव यांच्यावर अकलूज येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. प्रकृती नाजूक झाल्याने उपचारादरम्यान दि. २ रोजी पहाटे निधन झाले. या हल्ल्यात सद्दाम पटवारी हे देखील जखमी झाले आहेत. घटनेनंतर सर्व आरोपी गाडीतून घटनास्थळावरून फरार झाले.
या प्रकरणी मृत नागनाथ यांचे भाऊ महेश मच्छिंद्र जाधव (वय ३९, रा. वेणेगांव) यांनी टेंभूर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून राज कदम, समाधान चौधरी, रणजीत पवार (तिघे रा. टेंभूर्णी), सागर कुटे (रा. वेणेगांव) व इतर दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटना घडल्यानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश बावकर यांनी प्राथमिक नोंद केली असून, गुन्ह्याचा पुढील तपास करमाळा विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा या करत आहेत. आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली असून लवकरच त्यांना ताब्यात घेतले जाईल, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
नागनाथ जाधव हा पिकअप ड्रायवर म्हणून काम करत होता. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, दोन मुले, आई वडील असा परिवार आहे. भांडण सोडवण्यासाठी गेला असताना त्याचा हकनाक बळी गेला. सायंकळी सहा वाजता वेणेगांव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. तसेच, घटनास्थळावरील पुरावे गोळा केले जात आहेत. पोलिसांनी या प्रकरणातील सर्व पैलूंचा तपास करून लवकरच आरोपींना ताब्यात घेण्याचे आश्वासन दिले आहे.
या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी या घटनेचा निषेध केला असून, दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी पोलिसांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.
या घटनेनंतर विविध राजकीय पक्षांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी या घटनेचा निषेध केला आहे, तर काहींनी पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून, या प्रकरणाचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न अनेक पक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील टेंभूर्णीमध्ये गाडी पार्किंगच्या किरकोळ कारणावरून झालेल्या तुंबळ हाणामारीत नागनाथ मच्छिंद्र जाधव यांचा चाकूने भोकसून निर्घृण खून करण्यात आला आहे. मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या नागनाथ यांचा हकनाक बळी गेला. सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी फरार आहेत. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून, लवकरच त्यांना ताब्यात घेतले जाईल, अशी माहिती दिली जात आहे. या घटनेने संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.