क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - किरण देशमुख
पुणे : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पोलिसांना एक अत्यंत महत्त्वाचा पुरावा हाती लागला आहे. मुख्य आरोपी सिया गोयलच्या घरातून पोलिसांनी तिचा एक जुना मोबाईल फोन जप्त केला आहे. याशिवाय, दोन्ही आरोपींनी डिलीट केलेले चॅट्स पुन्हा मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे. या चॅट्समध्ये कोडवर्ड, निकनेम आणि इमोजीचा वापर करण्यात आला असून, त्यांचा उलगडा करण्यासाठी पोलीस सायबर तज्ज्ञांची मदत घेत आहेत. दरम्यान, सिया आणि चेतन यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे .
शुक्रवारी (ता. ३) सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना वडगाव येथील न्यायालयात हजर करण्यात आले . यावेळी तपास अधिकाऱ्यांनी आतापर्यंतच्या तपासातील प्रगतीचा अहवाल न्यायालयासमोर मांडला. पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी मोबाईलमधील चॅट्स डिलीट केले होते. मात्र, सायबर टीमच्या मदतीने हा डेटा पुन्हा मिळवण्यात यश आले आहे . या संभाषणात अनेक ठिकाणी कोडवर्ड्स, टोपणनावे आणि इमोजीचा वापर करण्यात आला आहे .
पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, हे संभाषण नेमके कशाबद्दल होते आणि त्यांचा उद्देश काय होता, हे जाणून घेण्यासाठी दोन्ही आरोपींना समोरासमोर बसवून चौकशी करणे आवश्यक आहे . या चॅट्सचा उलगडा झाल्यास हत्येच्या कटात तिसऱ्या व्यक्तीचा सहभाग असल्याचे स्पष्ट होऊ शकते, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली . या कारणासाठी पोलिसांनी कस्टडी वाढवून देण्याची मागणी केली.
मात्र, न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून ते आता येरवडा मध्यवर्ती कारागृहात आहेत . पोलिसांनी मागितलेली पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली .
तपासादरम्यान पोलिसांनी सिया गोयलच्या घरातून तिचा एक वर्ष जुना मोबाईल फोन जप्त केला आहे . आता पोलीस या जुन्या फोनचाही तांत्रिक तपास करत आहेत. फोन फॉरेन्सिक सायन्स लॅब (FSL) मध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे .
मिळालेल्या माहितीनुसार, सिया आणि चेतन यांची भेट एका दिवाळी पार्टीदरम्यान झाली होती आणि हा संपूर्ण घटनाक्रम एका वर्षापेक्षा कमी कालावधीतील आहे . त्यामुळे हा जुना फोन या प्रकरणाच्या मूळ कटाचा छडा लावण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो .
तपासात असे समोर आले आहे की, सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पहिली भेट क्रिकेटच्या मैदानावर झाली . सियाचा भाऊ साहिल गोयल आणि चेतन हे एकत्र क्रिकेट खेळायचे . सिया नेहमी भावासोबत सामने पाहण्यासाठी जात असे. याच मैदानावर सिया आणि चेतनची पहिली भेट झाली .
त्यानंतर एका मित्राच्या दिवाळी पार्टीत हे दोघे पुन्हा समोरासमोर आले . या पार्टीनंतर त्यांच्यात नियमित भेटीगाठी वाढू लागल्या आणि मैत्री प्रेमात बदलली .
पोलिसांनी आरोपींचे सीडीआर (Call Detail Records) तपासले असता, धक्कादायक माहिती समोर आली. मागील काही महिन्यांत सिया आणि चेतन यांच्यात तब्बल २००४ वेळा फोनवर संपर्क झाला होता. या दोघांनी मिळून सुमारे २३८ तास संवाद साधला होता . केतनसोबत लग्न ठरलेलं असतानाही सिया आणि चेतन तासनतास एकमेकांच्या संपर्कात होते .
सिया आणि चेतनच्या नात्याची माहिती असल्याने पोलिसांनी सियाचा भाऊ साहिल गोयल याची तब्बल १० तास चौकशी केली . पोलिसांच्या म्हणण्यानुसार, साहिलला सियाच्या चेतनसोबतच्या प्रेमसंबंधांची माहिती होती. तो सियाला लग्न झाल्यानंतर हा संबंध संपवण्याचा सल्ला देत होता . मात्र, या कटात साहिलचा सहभाग होता का, याची चौकशी सुरू आहे .
या संपूर्ण प्रकरणात दोघांचे चॅट्स पुन्हा मिळवणे हा पोलिसांसाठी मोठा टप्पा मानला जात आहे . मात्र, या चॅट्समध्ये वापरलेले सांकेतिक शब्द, टोपणनावे आणि इमोजी तपासात अडथळा ठरत आहेत . हे कोडवर्ड्स हत्येच्या कटाशी कसे जोडलेले आहेत, हे समजून घेण्यासाठी पोलीस फॉरेन्सिक आणि सायबर तज्ज्ञांची मदत घेत आहेत .
दोन्ही आरोपींनी डिलीट करण्यापूर्वी रिसायकल बिन आणि इतर डिजिटल ट्रेसेसही साफ केल्याचे समोर आले आहे . त्यामुळे फॉरेन्सिक तंत्रज्ञांना संवाद पुन्हा तयार करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत आहेत .
पोलीस कोठडीदरम्यान तपास यंत्रणेने अनेक महत्त्वाची पावले उचलली:
1. कटाचे ठिकाण: कट कुठे रचला, याची संबंधित ठिकाणी आरोपींना नेत तपासणी करण्यात आली.
2. हत्येचा सराव: हत्येचा सराव पुण्यातील लुल्लानगर येथील टेकडीवर झाला. तेथे सियाला घेऊन पोलिसांनी सरावस्थळाची पाहणी केली .
3. डिलीट डेटा रिकव्हर: डिलीट डेटा रिकव्हर करण्यात पोलिसांना यश आले .
4. तिसऱ्या व्यक्तीची चौकशी: गुन्ह्यानंतर कुणाशी चर्चा केली, याबाबत चौकशी करून चेतनच्या एका मित्राला ताब्यात घेण्यात आले .
5. सीन रिक्रिएशन: सिया आणि चेतन यांना वेगवेगळे लोहगडावर नेत घटनेचे सीन रिक्रिएशन करण्यात आले . चेतनचे गेट अॅनालिसिस करून सबळ पुरावा मिळवला .
6. सीसीटीव्ही तपासणी: लोहगडावरील सीसीटीव्हींची तपासणी करून एकमेकांना कसे खुणावले, याची चौकशी करण्यात आली.
7. हत्येचे पूर्व प्रयत्न: १८ जूनपूर्वीही ३१ मे, ४ जून आणि १४ जून ला केतनच्या हत्येचा प्रयत्न झाला होता का, याची घटनास्थळी जाऊन चौकशी करण्यात आली .
8. पासपोर्ट शोध: पुणे-मुंबई महामार्गावरील फूड मॉलमध्ये जाऊन केतनचा पासपोर्ट शोधण्याचा प्रयत्न केला.
9. साक्षीदार: नवे काही साक्षीदार समोर आल्याचा पोलिसांचा दावा असून, त्यांची आणि आरोपींची समोरासमोर चौकशी करण्यात आली.
10. रेकी: हत्येपूर्वी सिया आणि चेतन यांनी किती वेळा लोहगडाची रेकी केली, याची चौकशी करण्यात आली.
11. इतर सहभागी: हत्येच्या कटात आणखी कोण सहभागी आहे का, याची दोघांकडे चौकशी करण्यात आली .
12. कपडे जप्त: हत्येच्या दिवशी सियाने घातलेले कपडे, बूट, बॅग तसेच चेतनची हुडी, पॅन्ट जप्त करण्यात आली
आता दोन्ही आरोपी १६ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत असणार आहेत . पोलीस आता डिजिटल पुराव्यांचे विश्लेषण, साक्षीदारांच्या जबाबांची तपासणी आणि उर्वरित वैज्ञानिक तपास पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहेत . फॉरेन्सिक तपासणीतून जर कोडवर्ड्सचा उलगडा झाला आणि तिसऱ्या व्यक्तीचा सहभाग स्पष्ट झाला, तर या प्रकरणाला आणखी एक नवे वळण मिळू शकते.

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.