सहा खासदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंना 'डरो मत' म्हणत धीर; भाजपवर जोरदार टीका; 'जे होतंय ते होऊ द्या, जे होणार आहे ते होणारच'
क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात ‘ऑपरेशन टायगर’मुळे सध्या जोरदार खळबळ उडाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ६ खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच, शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार भास्कर जाधव यांचे WhatsApp स्टेटस चर्चेत आले आहे. 'हज़ारों अच्छाईयो की कोई रसीद नाही होती, पर एक गलती का पुरा हिसाब राखा जात हैं' असे सूचक विधान त्यांनी केले आहे.
'....पर एक गलती का पुरा हिसाब राखा जात हैं'
भास्कर जाधव यांनी या स्टेटसद्वारे नेमक्या कुणावर निशाणा साधला आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदारपणे सुरू आहे. हे स्टेटस अशा वेळी आले आहे, जेव्हा त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना 'उद्धवसाहेब घाबरून जाऊ नका, ही वेळ देखील निघून जाईल. जे होतंय ते होऊ द्या, जे होणार आहे ते होणारच आहे. हे दिवस निघून जाण्यासाठी आपल्याला कार्यक्रम हाती घ्यावा लागेल. उद्धवसाहेब डरो मत..' असे म्हटले आहे.
भास्कर जाधव पुढे म्हणाले, देशात फक्त आम्हालाच राहायचं आहे, अशा दुष्ट हेतूने काँग्रेसने कुठलाही पक्ष संपवण्याचे काम केले नाही. ओम बिर्ला यांना कोणी काय पत्र दिलं हे माझ्यासाठी गौण विषय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
'हज़ारों अच्छाईयो की कोई रसीद....' मागचा नेमका रोख कुणाकडे?
भास्कर जाधव यांच्या या स्टेटसबाबत वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत. अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते, हे स्टेटस पक्षातील विद्यमान नेतृत्वाच्या कार्यपद्धतीकडे बोट दाखवते. 'हज़ारों अच्छाईया' म्हणजे पक्षाने दिलेली संधी, प्रेम आणि मान-सन्मान, तर 'एक गलती' म्हणजे कोणीतरी केलेली चूक जिचा सगळा हिशोब ठेवला जातो, असा त्याचा अर्थ आहे.
काही दिवसांपूर्वीच भास्कर जाधव यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीत बदल करण्याची गरज व्यक्त केली होती. ते म्हणाले होते, "आम्हाला आमच्या कार्यपद्धतीत सुधारणा करावी लागेल. कार्यपद्धती बदलून नवीन उमेदीने, योजनेने सामोरं जावं लागेल." तसेच आदित्य ठाकरेंनी घराबाहेर पडण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली होती.
भास्कर जाधवांनी भाजपवर केला जोरदार हल्ला
भास्कर जाधव यांनी सत्ताधारी भाजपवरही जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, "पक्ष फोडून तुमच्या पक्षाची सूज वाढत असली तरी, तुमचा समाजातला आदर रसातळाला जातोय. पक्षांतर बंदी कायदा संपवून टाका, मग देशात मजा येईल."
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, जे खासदार पक्ष सोडत आहेत, ते कोणतीही विचारधारा मान्य करून जात नाहीत, तर छळवाद आणि कंटाळवाण्यामुळे जात आहेत. "जाणारे लोक आमच्या मतदारसंघातील विकास होत नाही, सरकार मदत करत नाही असे सांगत आहेत. काहीजण जेलमध्ये जाण्यापेक्षा भाजपा बरा सांगत आहेत."
भास्कर जाधवांचे 'डरो मत' उद्धव ठाकरेंना धीर
भास्कर जाधव यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना धीर देताना सांगितले की, ही वेळही निघून जाईल. मात्र, त्यासाठी पक्षाला नवे कार्यक्रम आखावे लागतील. "पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी नेतृत्वाने काही कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे."
तसेच, भास्कर जाधव यांनी काँग्रेसचे उदाहरण देताना भाजपवर टीका केली. "काँग्रेसच्या काळातही पक्षांतरे झाली, नेते पक्ष सोडून गेले. पण विरोधी पक्षांना पूर्णपणे संपवून टाकण्याचा किंवा देशात एकच पक्ष उरावा असा दुष्ट हेतू काँग्रेसने कधी ठेवला नाही."
'ऑपरेशन टायगर'ची संपूर्ण टाईमलाइन
१० जून – एनडीए बैठकीदरम्यान अमित शाह आणि शिंदे यांच्यात 'ऑपरेशन टायगर'बाबत चर्चा; अमित शाहांनी मोदींशी चर्चा करून संमती मिळवली; दिल्लीतल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठाकरेंच्या खासदारांची शिंदेंसोबत भेट.
१४ जून – उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली; अनिल देसाई, अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे बैठकीला हजर; नागेश आष्टीकर, संजय देशमुख ऑनलाईन; ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय जाधव गैरहजर.
१५ जून – खासदार संजय देशमुख यांची दिल्लीत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांशी भेट.
१६ जून – रात्री ठाकरेंचे ६ खासदार दिल्लीत गेल्याच्या बातम्या; शिंदेही रवाना; फुटीर गटाला मान्यता देऊ नका, अरविंद सावतांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र.
१७ जून – संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे यांची पत्रकार परिषद; ठाकरेंच्या ६ खासदारांचा स्वतंत्र गट स्थापन, लोकसभा अध्यक्षांना पत्र; ठाकरेंकडून सर्व खासदारांना १८ जूनच्या संसदीय पक्ष बैठकीसाठी व्हीप.
भास्कर जाधवांच्या स्टेटसचा राजकीय अर्थ
भास्कर जाधव यांचे हे WhatsApp स्टेटस 'ऑपरेशन टायगर'च्या पार्श्वभूमीवर अत्यंत सूचक मानले जात आहे. 'हजारो चांगुलपणाची रसीद नसते, पण एका चुकीचा सगळा हिशोब ठेवला जातो' – हे वाक्य पक्षातील नाराजीला उघड करते का, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. संजय राऊत यांनीही यावर टिपण्णी करताना जाधव यांना पक्षप्रमुखांशी थेट बोलण्याचा सल्ला दिला आहे.
भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरेंना 'डरो मत' म्हणत धीर दिला असला, तरी त्यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीत बदल करण्याची गरजही अधोरेखित केली आहे. आता पुढील काही दिवस ठाकरे गटासाठी कसे राहतात आणि भास्कर जाधव यांची भूमिका काय राहते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.