हवामान विभागाचा अंदाज – २४-२५ जूननंतर कोकणात पावसाला पोषक वातावरण; उष्णतेच्या झळा सहन करताना मुंबईकर हैराण; राज्यभर यलो अलर्ट
क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे
मुंबई : निम्मा जून उलटला तरी महाराष्ट्रात मान्सूनच्या पावसाचा थेंब आलेला नाही. बहुतांश राज्यात मान्सूनची ओढ कायम आहे. अल निनोच्या परिस्थितीमुळे नैऋत्य मोसमी वारे अरबी समुद्रात अडकले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून मान्सूनला महाराष्ट्रात मुंबई, कोकण तसेच पुढे आगेकूच करण्यासाठी पोषक परिस्थिती तयार होत नाही. राज्यात अनेक जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटांचे इशारे देण्यात आले आहेत. त्यामुळे आतुरतेने पावसाची वाट पाहणाऱ्या नागरिकांना उन्हाचा चटका असह्य झाला आहे.
मान्सूनची प्रगती ठप्प, नेमकं कारण काय?
यंदा केरळमध्ये उशिराने दाखल झालेला मान्सून ६ जून रोजी तळकोकणात दाखल झाला . ८ जूनला हर्णे आणि सोलापूरच्या पट्ट्यात मान्सूनने हजेरी लावली . त्यामुळे राज्यभरात लवकरच मान्सूनचे आगमन होईल, असा अंदाज लावण्यात येत होता. मात्र, प्रशांत महासागरात अल निनोची अनुकूल परिस्थिती आणि पश्चिमी जेट स्ट्रीम नेहमीपेक्षा अधिक दक्षिणेकडे सरकल्याने मान्सूनला गती देणाऱ्या वाऱ्यांवर परिणाम झाला . पण गेल्या आठवड्याभरापासून मान्सूनची प्रगती ठप्प आहे.
हवामान विभागाने स्पष्ट केले आहे की, कमकुवत आर्द्रता प्रवाह, मान्सून अभिसरण कमी होणे आणि चक्रीय वाऱ्यांच्या प्रणालीचा अभाव यामुळे मान्सूनची वाटचाल थांबली आहे . २२ ते २४ जूनच्या दरम्यान हवामान अनुकूल झाल्यास मान्सूनच्या वाटचालीस पोषक वातावरण मिळण्याची शक्यता आहे .
हवामान विभागाचा अंदाज काय?
पंजाबपासून बिहारपर्यंत कमी दाबाचा पट्टा अद्याप सक्रिय आहे. तसेच पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व विदर्भ, तेलंगणा ते आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीपर्यंतही हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. याशिवाय, पूर्व विदर्भ आणि दक्षिण छत्तीसगडच्या भागावर समुद्रसपाटीपासून सुमारे ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, आज मुंबईत सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. वेस्टर्न सबर्ब भागात काही भागांमध्ये पाऊस झाल्याची माहिती आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २४ ते २५ जूनच्या दरम्यान कोकण आणि मुंबईत पावसाला पोषक वातावरण तयार होऊ शकते . त्यामुळे लवकरच नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
सध्या परिस्थिती काय?
पुढील चार-पाच दिवस राज्यात केवळ तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे . आयएमडीच्या म्हणण्यानुसार, जून महिन्यात मुंबईत सरासरी ५२६ मिमी पाऊस पडतो, मात्र यंदा आतापर्यंत संताक्रूझ वेधशाळेत केवळ १२.९ मिमी तर कोलाबा वेधशाळेत ४.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे . हा आकडा सरासरीपेक्षा २००% पेक्षा अधिक कमी आहे .
मुंबईत बुधवारी कोलाबा वेधशाळेने ३५.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले, जे सरासरीपेक्षा चार अंशांनी अधिक होते. संताक्रूझ येथे ३४.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले .
महाराष्ट्रात कुठे काय अलर्ट?
१८ जून
यलो अलर्ट (उष्ण व दमट हवामान): पालघर, मुंबई, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, सोलापूर, जळगाव, धुळे, नंदुरबार, अकोला, अमरावती.
यलो अलर्ट (मुसळधार पाऊस): रायगड, रत्नागिरी, पुणे घाट परिसर.
यलो अलर्ट (विदर्भात मुसळधार पाऊस): यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.
- मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस.
१९ जून
यलो अलर्ट (उष्ण व दमट): मुंबई, पालघर, रत्नागिरी, नाशिक, जळगाव, संभाजीनगर, जालना, बीड, सोलापूर, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया.
यलो अलर्ट (पाऊस): रायगड, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर.
नागरिकांसाठी सल्ला
पुढील काही दिवस उष्णता आणि दमट हवामान कायम राहणार असल्याने, नागरिकांनी अत्यावश्यक नसल्यास दुपारच्या वेळी बाहेर पडणे टाळावे. पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे आणि उन्हाचा त्रास होत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
कापणीच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस पाऊस स्थिरावण्याची प्रतीक्षा करावी, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे . अद्याप सातत्यपूर्ण आणि पुरेशा पावसाची शक्यता कमी असल्याने घाईघाईने पेरणी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे .
कधी येणार मान्सून?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २४ ते २५ जूनच्या दरम्यान कोकण किनारपट्टीवर पावसाला पोषक वातावरण तयार होईल . त्यानंतर मान्सूनची प्रगती वेगाने होण्याची शक्यता आहे. मात्र, तोपर्यंत नागरिकांना उकाडा आणि दमट हवामान सहन करावे लागणार आहे. हवामान विभाग सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आता पुढील काही दिवसात मान्सूनची प्रगती कशी होते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.