पहिल्या रांगेत बसण्यावरून वाद; 'हा मराठा समाजाचा कार्यक्रम, तुम्ही बसू नका' – अभिमन्यू पवारांचा दावा; मेधा कुलकर्णी म्हणाल्या – 'मुख्यमंत्र्यांना कुणी भेटायचं हे ते ठरवणार?'
क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतच भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) आणि आमदार अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar) यांच्यामध्ये नाराजीनाट्य रंगल्याचे दिसून आले. पहिल्या रांगेत बसण्यावरून त्यांच्यामध्ये वाद झाल्याचे आढळून आले . त्यानंतर मेधा कुलकर्णी यांनी अभिमन्यू पवार यांच्यावर जोरदार टीका केली. अभिमन्यू पवार यांच्या निवडणुकीत आपण मतदानासाठी ब्राह्मण समाजाला आवाहन करण्यासाठी गेल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अभिमन्यू पवारांना सर्वकाही आपल्याच हाती असावे असे वाटते, त्यामुळेच त्यांनी आपल्याला मुख्यमंत्र्यांना भेटू दिले नसल्याचा दावाही त्यांनी केला.
नेमकी घटना काय?
पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते UPSC आणि MPSC उपक्रमात यशस्वी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता . या कार्यक्रमात पहिल्या रांगेत बसण्यावरून भाजप खासदार मेधा कुलकर्णी आणि भाजपचे औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्यात नाराजीनाट्य रंगले.
मेधा कुलकर्णी यांच्या म्हणण्यानुसार, कार्यक्रमात पहिल्या रांगेत काही रिकाम्या खुर्च्या होत्या. खासदार म्हणून त्यांची जागा पहिल्या रांगेत येते. मात्र, अभिमन्यू पवार यांनी त्या ठिकाणी बसण्यासाठी धावपळ केली. त्यावेळी अभिमन्यू पवार म्हणाले, "हा कार्यक्रम मराठा समाजाचा आहे, तुम्ही तिथे बसाल तर वाद निर्माण होईल." मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, शासकीय प्रोटोकॉलनुसार खुर्च्यांची रचना असते, जातीप्रमाणे नसते .
'अभिमन्यू पवारांसाठी ब्राह्मण समाजाची मतं मागितली'
मेधा कुलकर्णी यांनी अभिमन्यू पवार यांच्या निवडणुकीचा इतिहासही काढला. त्या म्हणाल्या, "अभिमन्यू पवार ज्यावेळी निवडणुकीला सामोरे जात होते, त्यावेळी ते मला फोन करून विनंती करत होते. 'माझ्याकडे या, ब्राह्मण समाजाच्या मेळाव्यात मतदानासाठी आवाहन करा,' अशी विनंती त्यांनी केली. त्यावेळी माझी तब्येत ठीक नसतानाही मी त्यांच्यासाठी गेले आणि ब्राह्मण समाजाला एकगठ्ठा मतदान करण्याचे आवाहन केले. आमच्या समाजाने त्यांना मतदान केले."
त्यांनी जातीचा मुद्दा काढून अभिमन्यू पवारांवर टीका करताना म्हटले, कार्यक्रम काय सुरू आहे आणि तुम्ही काय बोलता? इथे समाजाचा विषय येतो कुठे? आपल्यासमोर देशात मोठे आव्हान आहे. त्यासाठी हिंदू म्हणून एकत्र येणे हा मुद्दा आहे. एकमेकांच्या जाती काढून काय फायदा?"
'मुख्यमंत्र्यांना भेटू दिले नाही'
मेधा कुलकर्णी यांनी आणखी एक गंभीर आरोप केला. त्या म्हणाल्या, "या कार्यक्रमाच्या आधी देवेंद्र फडणवीस व्हीआयपी लाउंजमध्ये बसले होते. त्यावेळी मी एक गंभीर केस घेऊन आले होते. मराठा समाजाचे बांधव त्यांच्या न्यायासाठी झगडत होते, त्यांना मी घेऊन गेले होते. पण अभिमन्यू पवार यांनी अडवले. 'तुम्ही आत यायचे नाही, यांना आत सोडू नका,' असे त्यांनी पोलिसांना सांगितले."
"देवेंद्र फडणवीसांनी कुणाला भेटायचे आणि कुणाला नाही हे आता अभिमन्यू पवार ठरवणार का?" असा संताप्त सवाल त्यांनी केला.
'स्वतःला सुपीरियर समजतात'
मेधा कुलकर्णी पुढे म्हणाल्या, "बसण्यावरून कोणताही वाद नाही, पण यामध्ये जातीचा संबंध कोणता आला? अभिमन्यू पवार हे स्वतःला कुणीतरी सुपीरियर व्यक्ती समजतात, असे दिसते. त्यामुळे मी माझ्या बॉससोबत बोलेन."
त्यांनी आपल्याला पुण्यातील अनेक कार्यक्रमांचे निमंत्रण नसल्याची नाराजीही व्यक्त केली. त्या म्हणाल्या, "आपणही पक्षाचे लहान कार्यकर्ते आहोत, पण डावलले जाते. मला मेट्रोच्या कामाचे निमंत्रण नव्हते, पीएमआरडीएच्या पुलाच्या कार्यक्रमाचेही निमंत्रण नव्हते. तरीही मी वृत्तपत्रात वाचून कार्यक्रमाला जाते."
राजकीय परिणाम
मेधा कुलकर्णी आणि अभिमन्यू पवार यांच्यातील हा वाद भाजपसाठी अस्वस्थ करणारा आहे. मराठा विरुद्ध ब्राह्मण अशा प्रकारच्या चर्चांनी पक्षाच्या अंतर्गत एकजुटीवर परिणाम होऊ शकतो. अभिमन्यू पवार हे मराठा समाजाचे नेते मानले जातात, तर मेधा कुलकर्णी हे ब्राह्मण समाजाचे प्रतिनिधित्व करतात.
या वादामुळे पुण्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. दोन्ही नेत्यांनी आपापल्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत. आता पक्ष नेतृत्वाकडून या प्रकरणी कोणती भूमिका घेतली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
भाजपमधील मेधा कुलकर्णी आणि अभिमन्यू पवार यांच्यातील वाद पहिल्या रांगेत बसण्यापासून सुरू झाला आणि तो जातीय मुद्द्यापर्यंत पोहोचला. मेधा कुलकर्णी यांनी अभिमन्यू पवारांसाठी ब्राह्मण समाजाची मते मागितल्याचा इतिहास काढला. तसेच, मुख्यमंत्र्यांना भेटू न देण्याचा आरोपही केला. अभिमन्यू पवारांनी 'मराठा समाजाचा कार्यक्रम' असा उल्लेख केल्याने हा वाद जातीय वळणावर आला. आता पक्ष नेतृत्व या प्रकरणी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.