⚡ ब्रेकिंग News

देवापूर ग्रामपंचायतीची तब्बल २५ लाखांची कर थकबाकी; नागरी सुविधांचा उडाला बोजवारा!

 


घरपट्टी आणि पाणीपट्टी न भरल्याने विकासकामे ठप्प; गावातील १७ सीसीटीव्ही कॅमेरे धूळ खात बंद

देवापूर / विशाल माने:

कर्मवीरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी म्हणून महाराष्ट्रात ओळख असलेल्या देवापूर (ता. माण) ग्रामपंचायतीची तब्बल २५ लाख ७६ हजार ३८७ रुपयांची कर थकबाकी असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामध्ये घरपट्टीचे १४ लाख ७५ हजार ६३४ रुपये तर पाणीपट्टीचे ११ लाख ७५३ रुपये थकीत आहेत. कर भरणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असताना, एवढ्या मोठ्या प्रमाणावर थकबाकी राहिल्याने ग्रामपंचायतीला कर्मचाऱ्यांचे वेतन, पथदिव्यांचे वीजबिल भरणे आणि गावात मूलभूत सुविधा देणे अशक्य झाले असून गावातील नागरी सुविधांचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे.

निधीअभावी गावातील मुख्य रस्ते आणि प्रत्येक वॉर्डात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याचा नाहक मनस्ताप नियमित घरपट्टी व पाणीपट्टी भरणाऱ्या प्रामाणिक करदात्यांना सहन करावा लागत आहे. गावातील बहुतांश खांबांवरील पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य असते. नागरिकांनी वारंवार मागणी करूनही नवीन पथदिवे बसवण्यात आलेले नाहीत; सध्याचे दिवे केवळ दिखाव्यापुरते मर्यादित राहिले आहेत. तसेच, देशात सर्वत्र स्वच्छता अभियान राबवले जात असताना देवापूरमध्ये मात्र या योजनेला हरताळ फासला गेल्याचे चित्र आहे. जागोजागी साचलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, चिमुकल्यांसह वृद्धांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे.

देवापूर हे शैक्षणिक केंद्र असल्याने येथे सातारा जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यांतूनही अनेक युवक-युवती शिक्षणानिमित्त वास्तव्यास आहेत. मात्र, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी गावातील चौकाचौकात आणि मध्यवर्ती ठिकाणी बसवलेले १७ सीसीटीव्ही कॅमेरे अक्षरशः धूळ खात बंद अवस्थेत पडले आहेत.

याशिवाय गावातील पाणी व्यवस्थापनाचाही पूर्ण बट्ट्याबोळ उडाला आहे. पाण्याचे साधारण ३२ पैकी बहुतांश वॉल लिकेज असून, जीर्ण झालेल्या पाईपलाईन्समुळे पाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे. गावातील तिन्ही वॉर्डांमधील गटारांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून त्या कचऱ्याचे आगार बनल्या आहेत. पावसाळ्यात गटारांचे पाणी तुंबून रस्त्यावर येत असल्याने येथे रोगराईचे प्रमाण वाढले आहे. सध्या "गाव तसं चांगलं, पण वेशीला टांगलं" अशी म्हणण्याची वेळ स्थानिक करदात्यांवर आली आहे. ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांमधील अंतर्गत कलहामुळे प्रशासनाला मरगळ आल्याची चर्चा असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

नागरिकांनी कर भरून ग्रामविकासाला चालना द्यावी; चौकशी करणार - प्रदीप शेडगे

"गावातील पायाभूत सुविधा (रस्ते, पाणी, दिवाबत्ती इ.) सुरळीत चालण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर घरपट्टी आणि पाणीपट्टी वेळेवर भरणे अत्यंत गरजेचे आहे. करवसुली योग्य झाल्यास गावकऱ्यांना चांगल्या सुविधा देणे शक्य होते. थकबाकीदारांवर दंडात्मक कारवाई होऊ नये म्हणून नागरिकांनी वेळेत कर भरून प्रशासनाला सहकार्य करावे. माण तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानातून' कर सवलतीचा फायदा घेतला आहे. देवापूर येथील एवढ्या मोठ्या प्रमाणावरील थकबाकी आणि सुविधांच्या दुरवस्थेबाबत प्रशासकीय पातळीवर चौकशी करण्यात येईल."

— प्रदीप शेडगे (गटविकास अधिकारी, पंचायत समिती माण)

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...