⚡ ब्रेकिंग News

परीक्षेच्या आदल्या दिवशीच टीईटीचा पेपर फुटला; शिक्षणमंत्री दादा भुसेंनी सांगितली इनसाइड स्टोरी, म्हणाले – 'मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांना सखोल चौकशीचे आदेश'

भिवंडीत धाड, संशयितांकडील प्रश्नांमध्ये मूळ पेपरशी साम्य; परीक्षा स्थगित; नवीन तारीख लवकरच जाहीर; ६ लाख १२८ परीक्षार्थींना नवीन नोंदणीची गरज नाही

क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे

मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने राज्यभरात आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेपूर्वी (TET Exam) पेपर लीक (Paper Leak) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर राज्य सरकारने या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर, राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

 संशयितांकडील प्रश्नांमध्ये आढळले साम्य

पत्रकारांशी बोलताना शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे म्हणाले की, "पाठीमागच्या काळामध्ये नीट (NEET) परीक्षेमध्ये जे काही पेपरफुटीचे प्रकरण घडले होते, त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने देखील यंदा पूर्ण काळजी घेतलेली होती."

"परंतु, आज (२७ जून) पहाटे ठाणे भिवंडी पोलिसांच्या माध्यमातून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडीमध्ये काही इसमांकडे टीईटीचा पेपर उपलब्ध असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली."

पोलिसांनी तातडीने या विषयावर कारवाई करत मोठी ॲक्शन घेतली आणि संशयितांना ताब्यात घेतले . प्राथमिक पडताळणी दरम्यान, या संशयितांकडून मिळालेल्या प्रश्नांमध्ये आणि मूळ प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्नांमध्ये साम्य आढळले आहे . हा घडलेला प्रकार अत्यंत गंभीर बाब असून, पोलीस प्रशासनाच्या चौकशीमध्ये ज्या काही बाबी समोर येतील त्याप्रमाणे दोषींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे भुसे यांनी स्पष्ट केले.

 मुख्यमंत्र्यांकडून सखोल चौकशीचे आदेश

या पेपरफुटीच्या संशयानंतर विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होऊ नये म्हणून २८ जून रोजी होणारी परीक्षा स्थगित करण्यात आली आहे . शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितले की, "मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या घटनेची तातडीने दखल घेत पोलीस प्रशासनाला या प्रकरणाच्या मूळाशी जाण्याचे आणि सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या रॅकेटमध्ये सामील असलेल्या कोणत्याही दोषीला सोडले जाणार नाही."

 पुन्हा टीईटीची परीक्षा कधी होणार?

टीईटीचा पेपरफुटीनंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली . यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या बाबी स्पष्ट केल्या.

 नवीन तारीख आणि नियोजन

"ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. लवकर परीक्षा कधी होणार आहे, याचं नियोजन लवकर कळवू," असे प्रिया शिंदे यांनी सांगितले . "अशा प्रकारची परीक्षा घेण्यासाठी तीन आठवड्यांची प्रक्रिया असते," असेही त्यांनी स्पष्ट केले . येत्या २ ते ३ दिवसांनी टीईटी परीक्षेची नवीन तारीख घोषित केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली .

 परीक्षार्थींसाठी मोठा दिलासा

६ लाख १२८ शिक्षकांना पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही .

६ लाख १२६ परीक्षार्थींकडून अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही .

३७ शहरांतील १०२८ परीक्षा केंद्रांवर पुन्हा नव्याने परीक्षा घेतली जाणार आहे .

 प्रकरण काय आहे?

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने २८ जून रोजी राज्यातील १०२८ केंद्रांवर शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येणार होती . मात्र, २७ जून रोजी पहाटे भिवंडी पोलिसांना काही संशयितांकडे टीईटी प्रश्नपत्रिकेबाबत माहिती असल्याचा सुगावा लागला . पोलिसांनी धाड टाकून प्रश्न जप्त केले आणि त्यांची तुलना मूळ प्रश्नपत्रिकेशी केली असता काही प्रश्न जुळत असल्याचे आढळले . त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि परीक्षा स्थगित करण्यात आली .

टीईटी पेपरफुटी प्रकरणी शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार सखोल चौकशी आणि दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. परीक्षा स्थगित झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी असली, तरी प्रशासनाने पूर्ण पारदर्शकता राखण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षा परिषदेने नवीन तारीख लवकर जाहीर करण्याचे आणि परीक्षार्थींच्या सोयीसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारण्याचे स्पष्ट केले आहे. आता पोलिसांच्या तपासात या पेपरफुटी रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण हे स्पष्ट होणे महत्त्वाचे आहे.




Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...