म्हसवडमध्ये वाळू माफियांचा पुन्हा सुळसुळाट; माण नदीपात्रात रात्रीस खेळ चाले, प्रशासन 'गांधारी'च्या भूमिकेत!
म्हसवड (विशेष प्रतिनिधी):
म्हसवड शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाळू माफियांचा सुळसुळाट पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. ऐतिहासिक माण नदीपात्रातून दररोज लाखो रुपयांची वाळू बेकायदेशीरपणे लुटली जात असताना, महसूल आणि पोलीस प्रशासन मात्र पूर्णपणे सुस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, म्हसवडमध्ये अपर तहसील असून सुध्दा, असुन अडचन नसून खोळंबा अशी अवस्था आहे. प्रशासनाने या गंभीर प्रकाराकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत 'गांधारी'ची भूमिका घेतल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
गाढवांच्या माध्यमातून वाळूची तस्करी; 'रात्रीस खेळ चाले'!
म्हसवड परिसरात सध्या वाळू चोरीसाठी एक नवी शक्कल लढवली जात आहे. मध्यरात्री २ नंतर माण नदीपात्रात वाळू उपशाचा 'रात्रीस खेळ' सुरू होतो. ट्रॅक्टर किंवा मोठ्या गाड्यां माध्यमातून वाळू चोरी होतेय पण माफियांकडून चक्क गाढवांच्या माध्यमातून वाळूची छुपी वाहतूक केली जात आहे. म्हसवड परिसरातील देवापूर, शिरताव आणि विरकरवाडी या गावांच्या हद्दीतील नदीपात्रातून वाळू चोरीचे हे मोठे रॅकेट सध्या सक्रिय आहे.
कार्यकर्ते 'भाऊंचे' की 'आप्पांचे'? कारवाई आधीच फोन खणखणतो!
म्हसवडमधील या वाळू तस्करीत स्थानिक राजकीय वरदहस्त असल्याची जोरदार चर्चा आहे. वाळू उपसा करणारे हे पांढरपेशी माफिया नेमके 'भाऊंचे' कार्यकर्ते आहेत की 'आप्पांचे'? असा सवाल आता सर्वसामान्यांना पडला आहे. जेव्हा कधी महसूल विभाग कारवाईचा बडगा उगारतो, तेव्हा नेमका वरून कुठूनतरी व्ही.आय.पी. फोन खणखणतो आणि आलेले अधिकारी कारवाईचा केवळ 'देखावा' करून रिकाम्या हाताने परत फिरतात.
माहिती आधीच लीक?
प्रशासनातील काही भ्रष्ट कर्मचाऱ्यांचे या माफियांसोबत थेट लागेबांधे असल्याचे स्पष्ट दिसत आहे. कारण कारवाईसाठी पथक निघण्यापूर्वीच नदीपात्रातील गाड्या आणि माणसे पसार झालेली असतात. हा निव्वळ योगायोग नसून 'माहिती लीक' होण्याचा प्रकार आहे.
मध्यरात्रीनंतर म्हसवड बसस्थानक परिसर बनतोय 'माफियांचा अड्डा'
एरवी रात्री २ नंतर म्हसवड बसस्थानक (एस.टी. स्टँड) परिसरात पूर्ण शुकशुकाट असतो. मात्र, याच वेळी वाळू माफियांच्या २ ते ४ टोळ्या, त्यांचे वॉचमन आणि दलाल या परिसरात घोळका करून बसलेले असतात. त्यांच्या गप्पांचे फड आणि हालचाली रात्रीच्या वेळी स्पष्ट दिसत असताना, गस्त घालणाऱ्या पोलिसांना आणि महसूल विभागाला हे टोळीवाले का दिसत नाहीत? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
वाळू लूट थांबणार का?: माण नदीचे पात्र आधीच कोरडे पडत चालले आहे, त्यात या बेसुमार उपशामुळे भूजल पातळी खालावण्याची भीती निर्माण झाली आहे.
प्रशासन जागा होणार का?: सर्वसामान्य नागरिकांना उघड्या डोळ्यांनी दिसणारी ही लूट रोखण्यासाठी जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी मसवडमध्ये विशेष मोहीम राबवणार का?
म्हसवड परिसरातील या संघटित वाळू चोरांमुळे शासनाचा महसूल तर बुडतच आहे, पण माण नदीचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. आता तरी वरिष्ठ प्रशासन जागे होऊन या 'भाऊ आणि आप्पांच्या' धनदांडग्या कार्यकर्त्यांवर कडक मोहीम उघडणार की माण नदीची ही लूट अशीच सुरू राहणार?
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.