नाशिक: नाशिकचा भोंदू अशोक एकनाथ खरात (उर्फ कॅप्टन) याच्या अडचणींत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज (दि. १३ एप्रिल) खरातची तिसऱ्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी संपल्याने त्याला नाशिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने या गुन्ह्यात त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली असून, चौथ्या गुन्ह्यात तपासासाठी त्याचा ताबा मिळवण्याकरिता एसआयटीने (विशेष तपास पथक) हालचाली तीव्र केल्या आहेत.
सुरक्च्या कारणास्तव अशोक खरातला आज ऑनलाइन (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) पद्धतीने न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सुनावणी सुरू होताच न्यायाधीशांनी खरातचे नाव विचारले आणि पोलिसांविरोधात मारहाणीची काही तक्रार आहे का? अशी विचारणा केली. त्यावर खरातने ‘नाही’ असे उत्तर दिले. यावेळी सरकारी वकील आणि आरोपीचे वकील सचिन भाटे न्यायालयात उपस्थित होते.
तिसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी
तिसऱ्या गुन्ह्यातील तपासासाठी खरातला पोलीस कोठडी देण्यात आली होती, ज्याची मुदत आज संपली. एसआयटीने आतापर्यंत झालेल्या तपासाचा तपशील न्यायालयात सादर केला. सरकारी पक्षाने तिसऱ्या गुन्ह्यातील पोलीस कोठडीचा हक्क अबाधित राखून खरातला चौथ्या गुन्ह्यात वर्ग करण्याची परवानगी मागितली आहे.
खरातचे वकील चौथ्या गुन्ह्यासाठी ‘वकीलपत्र’ घेणार आहेत. न्यायालयाने खरातला तिसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावली असली, तरी आता एसआयटी चौथ्या गुन्ह्यात त्याचा ताबा घेऊन पुन्हा पोलीस कोठडी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यानंतर आरोपी तुरुंगात जाईल, त्याची वैद्यकीय तपासणी केली जाईल, त्यानंतर त्याचा ताबा घेण्याच्या सूचना कोर्टाने पोलिसांना दिल्या. तर अशोक खरातला उद्या पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यामुळे उद्याच्या सुनावणीत नेमके काय घडणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
खरात कोठडीत पूर्ण हबकला
तपास पथकातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कोठडीच्या पहिल्या दोन-तीन दिवसांत अशोक खरातचा तोरा काही वेगळाच होता. “तुम्ही घोर अपराध केलाय, तुमच्यावर कोप होईल,” असे म्हणत तो चक्क तपास करणाऱ्या पोलिसांचेच भविष्य सांगण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, एसआयटी आणि ईडीच्या वाढत्या चौकशीमुळे आता त्याची बोलती बंद झाली आहे. आपण आता सहज तुरुंगातून बाहेर पडणार नाही, याची खात्री त्याला पटली असून तो स्वतःच्या भविष्याबद्दल कमालीचा चिंतेत आहे.
कोठडीत खरात आता जास्त कोणाशी बोलत नाही. तपासादरम्यान विचारलेल्या प्रश्नांनाही तो त्रोटक उत्तरे देत आहे. चिंतेमुळे त्याचे जेवणही कमी झाले असून तो तासनतास शांत बसून असतो, असे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे, बाहेर पडल्यानंतर लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल या भीतीने, न्यायालयातील सुनावणी प्रत्यक्ष न होता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारेच व्हावी, अशी विनंती तो अधिकाऱ्यांकडे वारंवार करत आहे.
बायकोचा पत्ता विचारताच...
अशोक खरातची पत्नी कल्पना खरात अद्याप फरार आहे. ती कुठे आहे? असा प्रश्न जेव्हा तपास अधिकाऱ्यांनी विचारला, तेव्हा खरातने “ते देवालाच माहीत” असे म्हणत हात झटकले. मात्र, दुसरीकडे आपला लाडका मुलगा हर्षवर्धन याच्यासाठी तो व्याकुळ झाला आहे. “माझ्या मुलाची मला काळजी वाटते, मला त्याच्याशी एकदा फोनवर बोलू द्या,” अशी विनंती तो पोलिसांकडे करत आहे.
ईडीचे धाडसत्र
दरम्यान, भोंदू अशोक खरात प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय (ED) कडून मोठी कारवाई सुरू करण्यात आली आहे. नाशिक, पुणे आणि शिर्डी परिसरात एकाच वेळी छापेमारी करत ईडीने तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. शिर्डी परिसरातील समता पतसंस्थेच्या राहाता शाखेत ईडीचे पथक दाखल झाले असून, अशोक खरात नॉमिनी असलेल्या सुमारे १०० खात्यांची चौकशी सुरू आहे. या खात्यांमधून ६० कोटींहून अधिक व्यवहार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
नाशिकमध्ये ५, पुण्यात ३ आणि शिर्डीत ३ ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. समता पतसंस्थेशी संबंधित आर्थिक व्यवहारांची सखोल पडताळणी सुरू असून, खरातच्या मालमत्ता आणि निधीच्या स्रोताचा शोध घेतला जात आहे. नाशिकमधील तृप्तबाला निवासस्थानी आयकर विभागाकडूनही छापेमारी करण्यात आल्याची माहिती आहे. खरेदी-विक्रीशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
तपासाची सद्यस्थिती
खरातवर आतापर्यंत लैंगिक शोषण, खंडणी, सावकारी आणि फसवणुकीचे तब्बल १४ गुन्हे दाखल झाले आहेत. आजच्या सुनावणीत सरकार पक्षाने तिसऱ्या गुन्ह्यातील पोलीस कोठडीचा हक्क अबाधित राखून खरातला चौथ्या गुन्ह्यात वर्ग करण्याची परवानगी मागितली. न्यायालयाने तिसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावली. एसआयटी आता चौथ्या गुन्ह्यात त्याचा ताबा घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
अशोक खरातची तिसऱ्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी संपल्याने त्याला आज नाशिक न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. एसआयटी चौथ्या गुन्ह्यात त्याचा ताबा घेण्यासाठी हालचाली करत आहे. खरात कोठडीत हबकला असून, जेवण कमी झाले, बोलती बंद झाली. बायकोचा पत्ता विचारताच “देवाला माहिती” असे उत्तर दिले. मुलाशी बोलू द्या अशी विनंती करत आहे. ईडीने नाशिक-पुणे-शिर्डीत धाडसत्र सुरू केले असून, समता पतसंस्थेतील १०० खात्यांची चौकशी सुरू आहे. उद्या पुन्हा न्यायालयात हजर करणार.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.