"खरात आमचे सभासद नाहीत, त्यांची कोणतीही गुंतवणूक नाही"; सिन्नर MIDC चेअरमन नामकर्ण आवारे यांचे पलटवार
नाशिक: शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अशोक खरात प्रकरणात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि रुपाली चाकणकर यांचे फोटो दाखवत गंभीर आरोप केल्यानंतर सिन्नर औद्योगिक वसाहतीचे (MIDC) चेअरमन नामकर्ण आवारे यांनी स्पष्टीकरण देत पलटवार केला आहे.
सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत एका कार्यक्रमातील फोटो दाखवले होते. त्यात दीपक केसरकर, रुपाली चाकणकर आणि अशोक खरात एकत्र दिसत होते. "शालेय शिक्षण मंत्र्यांचा एमआयडीसीच्या स्टाफशी काय संबंध? आणि तिथे रुपाली चाकणकर काय करत होत्या?" असा सवाल अंधारेंनी उपस्थित केला होता.
आवारे यांचे स्पष्टीकरण
नामकर्ण आवारे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले,
"सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत ही महाराष्ट्रातील एक नामवंत आणि नंबर एकची संस्था आहे. संस्थेच्या स्थापनेपासून आम्ही सिन्नर-शिर्डी मार्गाने जाणाऱ्या सर्व मंत्र्यांना सदिच्छा भेटीसाठी निमंत्रण देत असतो. त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो."
ते पुढे म्हणाले,
"२०२३ मध्ये तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर सिन्नर तालुक्यात आले असताना आम्ही त्यांना निमंत्रण दिले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत रुपाली चाकणकर होत्या, म्हणून आम्ही त्यांचाही सत्कार केला. मंत्र्यांसोबत कोण येणार हे आम्हाला आधी माहीत नसते, पण सोबत आल्यावर सन्मान करणे क्रमप्राप्त असते."
खरातशी संबंध नाही
आवारे यांनी स्पष्ट केले की,
"आमच्या औद्योगिक वसाहतीत अशोक खरात यांचा कोणताही कारखाना नाही, ते सभासदही नाहीत. त्यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर कोणतीही गुंतवणूक नाही. शेजारील माळेगाव औद्योगिक वसाहतीतही त्यांची कोणतीही गुंतवणूक आढळली नाही."
संस्थांवर प्रश्नचिन्ह
आवारे यांनी खंत व्यक्त केली की, अशोक खरात प्रकरणानंतर काहीजण खासगी संस्थांवर नाहक टीका करत आहेत. यामुळे अनेक वर्षांपासून उभ्या असलेल्या संस्थांवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. "प्रत्येक गोष्टीची शहानिशा करूनच भाष्य केले पाहिजे," असेही त्यांनी सांगितले.
सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपांमध्ये रुपाली चाकणकर यांच्या पती नीलेश चाकणकर आणि एका चौधरी व्यक्तीचा उल्लेख करत आर्थिक संबंध जोडण्याचा प्रयत्न केला होता. यावरही MIDC चेअरमन आवारे यांनी स्पष्ट उत्तर दिले आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.