क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे
मुंबई / छत्रपती संभाजीनगर - मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने 'तुमसे ना हो पाएगा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या मृत्यूबद्दल शंका उपस्थित केली होती. गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूचे रहस्य अद्याप उलगडले नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.
त्यांच्या या वक्तव्यानंतर आता मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी जोरदार पलटवार केला आहे.
गिरीश महाजन म्हणाले की, "एखाद्या विषयावरच लक्ष दुसरीकडे वळवायचं असेल तर अशा पद्धतीचे भडक वक्तव्य केले जातात."
"गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबद्दल कोणालाही शंका नाहीये. अगदी त्यांच्या कुटुंबातले पंकजाताई असतील किंवा कोणी असेल. कुणालाही शंका नाहीये," असे महाजन म्हणाले.
"पण, असं असतानाही असं मध्येच वाईट स्टेटमेंट करायचं हे मला वाटतं हे योग्य नाही," असेही ते म्हणाले.
"टीव्हीवर सध्या जे चाललं आहे, त्यावरचं लक्ष विचलित करण्याकरिता मला वाटतं हे अशा पद्धतीचं वक्तव्य केलं गेलं असावं," असा पलटवार त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.
उद्धव ठाकरे म्हणाले होते की, "प्रमोद महाजन आपलाला उद्याचे पंतप्रधान वाटायचे. एक काळ असा होता की, हा मराठवाडा देशाला पंतप्रधान देऊ शकेल असा नेता त्यांनी तयार केला होता. प्रमोदजी अनपेक्षितपणे आपल्यातून गेले."
"प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंनी भाजपची पाळंमुळं महाराष्ट्रात रुजवली ते आज दोघेही राहिले नाहीत," असे ते म्हणाले.
"गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूचं रहस्य अजूनही उलगडलं नाही," असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.
"मला वाईट काय वाटतं, जो भाजपची पाळंमूळं घेऊन लढला, तो सत्तेचा उपभोग घेऊ शकला नाही. सत्ता घेऊन तो मराठवाडा आणि देशाला काही देऊ शकला नाही हे शल्य माझ्या मनात आहे," असे ते म्हणाले.
"गोपीनाथ मुंडेंबद्दल मला एवढं वाईट वाटतं की, एक दिवससुद्धा ते मंत्री म्हणून लोकसभेच्या सभागृहात जाऊ शकले नाहीत. काल रात्री बोलतात काय, आज सकाळी बातमी काय येते, रहस्यमय मृत्यू..." असे म्हणत त्यांनी गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित केली होती.
गोपीनाथ मुंडे हे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री होते. ३ जून २०१४ रोजी दिल्लीत कार अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता. ते नुकतेच केंद्रीय ग्रामविकास मंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यांच्या अचानक मृत्यूने संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.
| मुद्दा | तपशील |
| उद्धव ठाकरेंचे वक्तव्य | गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूचं रहस्य उलगडलं नाही |
| गिरीश महाजनांचा पलटवार | 'लक्ष विचलित करण्यासाठी भडक वक्तव्य' |
| महाजनांचे म्हणणे | 'कुणालाही शंका नाही, पंकजाताईंनाही नाही' |
| गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू | ३ जून २०१४, कार अपघात |
| प्रमोद महाजन | २००६ मध्ये अनपेक्षित मृत्यू |

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.