गारपिटीचे भीषण संकट! राज्यातील ७ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, पुढील २४ तास अत्यंत धोक्याचे
हवामान विभागाचा मोठा इशारा; नाशिक, औरंगाबाद, बीड, जालना, परभणीत वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता, शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान
पुणे: राज्यातून अवकाळी पावसाने पाठ सोडण्याचे नाव घेतलेले नाही. मार्च महिना सुरू झाला असूनही सतत होणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांची मोठी दाणादाण उडवली आहे. काल राज्याच्या अनेक भागात झालेल्या मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान केले असून, आजही राज्यातील ७ जिल्ह्यांना गारपिटीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढील २४ तास या जिल्ह्यांसाठी अत्यंत धोकादायक असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
कोणत्या जिल्ह्यांना धोका?
भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार, नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार गारपिटीची शक्यता आहे. या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, राज्यातील इतर भागात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, राज्यात ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटाचा इशारा देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
काल झालेल्या पावसाने शेतीचे अतोनात नुकसान केले आहे. छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड तालुक्यात गारपीट झाली असून, गहू, ज्वारी, बाजरीसह फळबागायती व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोलापूर आणि सांगली जिल्ह्याच्या हद्दीवर दीड तासाहून अधिक काळ गारपिटीचा पाऊस झाला. जुनोनी भागात डाळिंब पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सांगलीच्या जत तालुक्यातील डफळापूर परिसरातही गारपिटीच्या पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे द्राक्ष, गहू, ज्वारी, आंबा या फळपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
राज्यात पुढील काही दिवस पावसाचे ढग कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकरी आणखी संकटात सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असून, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.