"लग्नात पाहुणचार केला, म्हणून मिठाला जागताय?"; अजित पवार विमान अपघात प्रकरणी रोहित पवारांचा केंद्रीय मंत्र्यांवर निशाणा
ब्लॅकबॉक्स सुरक्षित असताना जळाल्याचे सांगितल्याचा आरोप; VSR कंपनीशी आर्थिक संबंधांचा सवाल
पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या संवेदनशील मुद्द्यावर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी संसदेत दिलेल्या उत्तरावरून राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी मंत्र्यांच्या उत्तराला 'थातूरमातूर' ठरवत थेट त्यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत.
ब्लॅकबॉक्सवरून केंद्र सरकारला सवाल
रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मंत्र्यांसमोर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. "बारामती विमान दुर्घटनेतील ब्लॅकबॉक्स सुरक्षित असतानाही, मंत्र्यांनी तो जळाल्याचे का सांगितले? पारदर्शक तपासाचा दावा करताना ही खोटी माहिती का देण्यात आली?" असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच अहमदाबाद 'एअर इंडिया' विमान अपघाताबाबत अमेरिकन एजन्सीने मागितलेली माहिती का देण्यात येत नाही, याचेही उत्तर मागितले आहे.
VSR कंपनी प्रकरणी आरोप
रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये मंत्र्यांचे VSR कंपनीशी असलेले संबंध अधोरेखित केले आहेत. "ज्या VSR कंपनीचे विमान अपघातात सापडले, त्या कंपनीच्या मालकाच्या मुलाच्या लग्नात मंत्री पाहुणचार करून आलेले आहेत. त्यामुळेच की काय, ते आता त्या 'मिठाला' जागून चौकशीत पारदर्शकता टाळत आहेत?" असा बोचरा सवाल त्यांनी विचारला आहे.
संसदेत मांडणार मुद्दा
रोहित पवारांनी काँग्रेससह इंडिया आघाडीतील सर्व मित्रपक्ष हा विषय संसदेत प्रभावीपणे मांडतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. विमान प्रवाशांच्या सुरक्षिततेचा हा मुद्दा असल्याने यात कोणतीही तडजोड नसेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, या आरोपांमुळे केंद्रीय मंत्री आणि अजित पवार गटातील नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.