गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई; सातपूरमधून भरलेल्या १५८ सिलिंडरसह ट्रक-टेम्पो जप्त, ७ जणांवर गुन्हा दाखल
नाशिक: जिल्ह्यात सध्या गॅस टंचाईचे संकट असतानाच काही हॉटेल चालक आणि वितरकांनी परिस्थितीचा फायदा घेत काळाबाजाराला सुरुवात केली आहे. मात्र, पुरवठा विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईमुळे नाशिकमध्ये गॅस सिलिंडर काळाबाजाराचा मोठा धक्का बसला आहे. एकाच ट्रकमधून तब्बल ४४७ गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले असून, या मुद्देमालाची किंमत २५ लाख रुपयांहून अधिक आहे.
रात्री उशिरापर्यंत छापेमारी
जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड यांना शहरात मोठ्या प्रमाणावर गॅस सिलिंडरची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. याच्या आधारे त्यांच्या पथकाने सातपूर पोलिसांसह संयुक्तपणे सातपूर रोडवरील नाईस संकुल परिसरात छापा टाकला. यावेळी एका मोठ्या ट्रकमधून सिलिंडरची वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले.
कोणता मुद्देमाल जप्त?
तपासणीदरम्यान वाहनात १५८ भरलेले (वापरासाठी तयार) आणि २८९ रिकामे असे एकूण ४४७ सिलिंडर आढळून आले. पोलिसांनी हे सर्व सिलिंडर जप्त करण्यासोबतच एक मोठा ट्रक आणि दोन छोटे टेम्पो देखील ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकमधील हा पहिलाच गुन्हा
गॅस टंचाईचा फायदा घेत व्यावसायिक ग्राहकांसाठी राखीव असलेले सिलिंडर बेकायदेशीरपणे वळवून काळाबाजार करण्यात येत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नाशिकमध्ये अशा प्रकारचा हा पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे. वाहन चालकाने मात्र आपण सिलिंडरचा काळाबाजार न करता ते गोडाऊनमध्ये नेण्यासाठी नेत असल्याचा दावा केला आहे. पोलीस आणि पुरवठा विभाग या दाव्याची पडताळणी करत असून, या प्रकरणात इतर कोणाचा सहभाग आहे का याचाही तपास सुरू केला आहे.
गॅस टंचाईवर प्रशासनाची नजर
दरम्यान, इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस वापराबाबत नव्या मार्गदर्शक सूचना लागू झाल्याने नाशिक जिल्ह्यात घरगुती गॅस सिलिंडरचे रेशनिंग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने गॅस वितरक आणि हॉटेल्सची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. ग्राहकांना बुकिंगनंतर २ ते ३ दिवसांत सिलिंडर उपलब्ध करून देण्याचे नियोजन असून, नागरिकांनी अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.