⚡ ब्रेकिंग News

फार्च्युनरवर ‘पीएम’, पोलीस बॅरिकेड फोडून चार किमी पळताना अखेर पोबारा; वरोरातील ‘स्वयंघोषित पंतप्रधान’चा कारनामा



शेतीतून मिळाली पाच कोटींची कमाई, आता कारवर लावले ‘पीएम’चे स्टिकर; पोलिसांना दिला अर्ज, मागितले पिस्टल आणि अंगरक्षक!

क्रांती न्यूज विस्तृत वृत्त:

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात एका विचित्र प्रकाराने खळबळ उडाली आहे. स्वतःला पंतप्रधान म्हणवून घेणाऱ्या एका स्वयंघोषित नेत्याने पोलिसांची नाकाबंदी तोडल्याची घटना घडली आहे. महादेव आसेकर असे या व्यक्तीचे नाव असून, तो आपल्या फार्च्युनर गाडीवर 'पंतप्रधान' आणि 'पीएम' अशी आलिशान स्टिकर्स लावून फिरत होता.

नेमकं काय घडलं?

शनिवारी संध्याकाळी वरोरा शहरातील रत्नमाला चौकाजवळ पोलिसांनी तपासणीसाठी नाकाबंदी केली होती. त्यावेळी महादेव आसेकर आपल्या फार्च्युनर गाडीने तेथे आले. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला; मात्र आसेकर यांनी बॅरिकेड तोडत गाडी पुढे घेतली आणि तेथून पळ काढला. ही बाब लक्षात येताच पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. सुमारे चार किलोमीटरपर्यंत पाठलाग केल्यानंतर आसेकर यांनी अखेर आपली महागडी फार्च्युनर गाडी रस्त्यावर सोडून दिली आणि पायी पसार झाले. घटनेनंतर ते बेपत्ता असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांना दिलेला विचित्र अर्ज

काही दिवसांपूर्वीच आसेकर यांनी वरोरा पोलीस ठाण्यात एक अर्ज दाखल केला होता, ज्यामुळे त्यांची चर्चा रंगली होती. या अर्जात त्यांनी स्वतःला पंतप्रधान घोषित केल्याचा दावा करताना अनेक विचित्र मागण्या केल्या होत्या. त्यांनी पिस्टलसह अंगरक्षक देण्याची, पंतप्रधानांना मिळणारे प्रमाणपत्र घरपोहोच देण्याची मागणी केली होती. तसेच, काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करा, अशी मागणी करत वर्षा तंदूलकर या महिलेची पोलीस निरीक्षक (ठाणेदार) म्हणून नियुक्ती करण्याची अटकळ देखील त्यांनी घातली होती.

कोण आहे हा स्वयंघोषित पंतप्रधान?

मिळालेल्या माहितीनुसार, महादेव आसेकर यांना शेतीतून सुमारे पाच कोटी रुपयांचा नफा मिळाला आहे. या पैशातून त्यांनी वरोरा येथे आलिशान बंगला विकत घेतला आणि फार्च्युनर कार देखील आणली. सुरुवातीला ते स्वतःला 'कॅबिनेट दर्जाचा माणूस' म्हणवून घेत होते, नंतर त्यांनी कारवर 'व्हीआयपी पर्सन' असे लिहून घेतले. आता मात्र त्यांनी थेट 'पंतप्रधान' असल्याचा दंभ धरला आहे. ते खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या निवासस्थानाजवळ राहत असून, त्यांच्या घरासमोरून ते आपल्या गाडीचा रेसिंग सराव करत असल्याची माहिती समोर येत आहे.

यापूर्वी त्याच्या या वागण्याकडे पोलिसांनी गंमत म्हणून दुर्लक्ष केले होते. मात्र, बॅरिकेट तोडल्याप्रकरणी आता आसेकर यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या पोलीस त्यांचा शोध घेत असून, हा प्रकार राज्यभर चर्चेचा विषय बनला आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...