'लाडक्या बहिणीं'ना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज; देवेंद्र फडणवीसांचा मोठा मास्टरप्लॅन जाहीर
'लाडकी बहीण' योजनेतील हप्ता होणार कर्जासाठी हमी; मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा
'लाडक्या बहिणीं'ना व्यवसायासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज; देवेंद्र फडणवीसांनी मास्टरप्लॅन सांगितला; नेमकं काय म्हणाले?
मुंबई: राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा देणारा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे. 'लाडकी बहीण' योजनेला इतर शासकीय योजनांशी जोडून महिलांना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली. विशेष म्हणजे, या कर्जाची परतफेड 'लाडकी बहीण' योजनेतील हप्त्यांमधूनच केली जाणार आहे.
भाईंदर येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या प्रांगणात 'विकसित भारत नारी शक्ती संगम' या ग्रामीण महिला नेतृत्व परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार विनय सहस्रबुद्धे, पद्मश्री पोपटराव पवार, महापौर डिंपल मेहता आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "आम्ही 'लाडकी बहीण' योजनेला इतर शासकीय योजनांशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई बँकेमार्फत महिलांना कोणताही जामीन अथवा हमी न देता विविध व्यवसाय आणि उपक्रमांसाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. या कर्जाची परतफेड 'लाडकी बहीण' योजनेअंतर्गत महिलांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीतून होईल."
'उमेद'मधून होणार अंमलबजावणी
या उपक्रमाची अंमलबजावणी राज्य शासनाच्या 'उमेद' उपक्रमामार्फत करण्यात येणार आहे. जिल्ह्यानिहाय उभारण्यात येणाऱ्या 'उमेद मॉल'मध्ये महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल. यामुळे महिला केवळ उत्पादक न राहता स्वतःचे उद्योग उभारू शकतील आणि खासगी कंपन्यांनाही स्पर्धा देऊ शकतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
महिला कर्ज परतफेडीत अव्वल
जागतिक पातळीवर महिलांचा सहभाग वाढल्याने विकसित देशांच्या प्रगतीचा दाखला देत मुख्यमंत्री म्हणाले, "भारताची अर्थव्यवस्था सध्या जगात चौथ्या क्रमांकावर आहे आणि लवकरच ती तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल."
महिलांच्या कर्ज परतफेडीच्या क्षमतेवर भाष्य करताना ते म्हणाले, "सर्वसाधारण कर्ज योजनांमध्ये परतफेडीचे प्रमाण सुमारे ५० टक्के असते; मात्र महिलांना बचत गटांमार्फत दिल्या जाणाऱ्या कर्जाची परतफेड करण्याचे प्रमाण ९९ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. हे महिलांचे आर्थिक शिस्तीचे दमदार उदाहरण आहे."
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.