'खतरों के खिलाड़ी' सारख्या शोसाठी ५० लाखांचा व्यवहार; पैसे न परतवल्याने तगादा, प्राध्यापकाचा खून
स्वतःच्याच पिस्तुलातून गोळी झाडून खून; मोबाइल ऑन ठेवून जिवंत असल्याचा बनाव, मृतदेह गुप्तधनाच्या नावावर पुरला
सीसीटीव्ही फुटेज आणि जबाबातील विरोधाभासामुळे आरोपींचं पितळ उघडं; तिघांना अटक
छत्रपती संभाजीनगर: शहरात आर्थिक व्यवहारातून सेवानिवृत्त प्राध्यापकाचा खून करून 'क्राइम पेट्रोल'च्या कथेलाही लाजवेल असा बनाव रचणाऱ्या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील सिव्हिल विभागाचे माजी विभागप्रमुख राजाराम उत्तम लोंढे यांचा खून आरोपींनी डॉक्युमेंट्री फिल्मसाठी झालेल्या ५० लाख रुपयांच्या व्यवहारातून केल्याचे तपासात समोर आले आहे.
पार्टीच्या बहाण्याने नेऊन केला खून
मिळालेल्या माहितीनुसार, मृत प्राध्यापक आणि आरोपी विशाल राठोड, आकाश पवार, करण आडे यांच्यात 'खतरों के खिलाड़ी' सारखा टीव्ही शो तयार करून पैसे कमावण्यासाठी ५० लाख रुपयांचा आर्थिक व्यवहार झाला होता. मात्र, पैसे घेतल्यानंतर बराच काळ शो सुरू न झाल्याने प्राध्यापक लोंढे वारंवार पैशांची मागणी करत होते. सततच्या तगाद्याला कंटाळून आरोपींनी प्राध्यापकांना दौलताबाद येथे पार्टीसाठी बोलावले. तेथे पार्टी झाल्यानंतर परत येताना प्राध्यापकांच्या स्वतःच्याच पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडून खून केला.
जिवंत असल्याचा बनाव; गुप्तधनाच्या नावे पुरला मृतदेह
खून केल्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपींनी चित्रपटीय स्टाईलचा प्लॅन आखला. शहरातील सिग्मा हॉस्पिटलजवळ येईपर्यंत प्राध्यापकांचा मोबाइल ऑन ठेवण्यात आला, जेणेकरून ते जिवंत असल्याचा भास निर्माण होईल. त्यानंतर मृतदेह गाडीत ठेवून दुसऱ्या दिवशी गेवराई तांड्याजवळ नेला. तेथे एका जेसीबी चालकाला गुप्तधन असल्याची माहिती देऊन दोन खड्डे खणून घेतले आणि पहाटे प्राध्यापकांचा मृतदेह त्यात पुरून टाकला.
सीसीटीव्ही फुटेज आणि जबाबातील विरोधाभासाने उघडकीस
६ फेब्रुवारी २०२६ रोजी प्राध्यापक बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली होती. तपासादरम्यान संशयित विशाल राठोड आणि आकाश पवार यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता आरोपींच्या जबाबात मोठी तफावत आढळली. विशाल राठोडला विश्वासात घेऊन केलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. विशाल आणि राजाराम लोंढे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आर्थिक देवाणघेवाणीवरून वाद सुरू होते, अशी माहिती पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिली.
पोलिसांनी विशाल राठोड, आकाश पवार आणि करण आडे या तिघांना अटक केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.