लातूर : इराण-इस्रायल तणावाचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या व्यापारावर झाला आहे. जळगावच्या केळी-नाशिकच्या द्राक्षांनंतर आता लातूरच्या कृषी निर्यातदारांचा मोठा फटका बसला आहे. इराणमधील अब्बास बंदर आणि मुंबईतील न्हावा शेवा बंदरवर शेकडो टन माल अडकल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.
जगाचे लक्ष लागून राहिलेल्या इराण-इस्रायल संघर्षाचे पडसाद आता लातूरच्या (Latur) बाजारपेठेवर उमटू लागले आहेत. या युद्धजन्य परिस्थितीमुळे लातूरमधील निर्यातदारांचा मोठा माल बंदरात अडकून पडला असून, कोट्यवधी रुपयांची निर्यात ठप्प झाली आहे. अफगाणिस्तान आणि उझबेकिस्तानला कृषी उत्पादनांची निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
लातूरचे निर्यातदार श्रीहरी काल्या हे गेल्या चार वर्षांपासून सोयाबीन डीओसी, काबुली चणा आणि मका यांची निर्यात करतात. त्यांचा माल मुंबईतील न्हावा शेवा बंदरातून जलमार्गे इराणमधील बंदर अब्बास येथे पाठवला जातो व तेथून रस्तेमार्गे अफगाणिस्तान-उझबेकिस्तानला रवाना होतो; मात्र सध्या ही संपूर्ण यंत्रणा कोलमडली आहे.
250 टन माल इराणमध्ये अडकला :
इराणमधील वाढत्या तणावामुळे बंदर अब्बास येथे सुमारे 250 टन निर्यात माल अडकून पडला आहे. तेथील आयातदारांनी परिस्थिती पाहता हा माल उचलण्यास टाळाटाळ केली आहे.
800 टन माल न्हावा शेवा येथे थांबला :
मुंबईतील न्हावा शेवा बंदरावरही सुमारे 800 टन माल गोदामात अडकला आहे. पुढील वाहतुकीबाबत अनिश्चितता निर्माण झाली असून, लातूर येथील कारखान्यात निर्यातीसाठी तयार असलेला आणखी 175 टन मालही सध्या थांबविण्यात आला आहे.
पेमेंट अडकल्याने आर्थिक ताण :
बंदरात अडकलेला माल ग्राहकांपर्यंत न पोहोचल्याने पेमेंट मिळणे बंद झाले आहे. यामुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्याचे श्रीहरी काल्या यांनी सांगितले. केवळ लातूरच नव्हे, तर आखाती देशांना निर्यात करणाऱ्या राज्यातील अनेक व्यापाऱ्यांची अशीच स्थिती असून, जागतिक संघर्षाचा थेट परिणाम लातूरसारख्या जिल्ह्यातील उद्योगांवर होत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.