मुंबई : जैन मंदिरांसाठी पाच सिलेंडरची विनंती करणाऱ्या पत्राने राजकीय वादळ उठले आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या या पत्रानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेच्या वतीने डी.बी. मार्ग पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करून लोढा यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून आखाती देशातील युद्धामुळे गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा स्थितीत मलबार हिलमधील १६ जैन मंदिरांना प्रत्येकी पाच सिलेंडर देण्याची विनंती करणारे पत्र मंत्री लोढा यांनी सहकारी मंत्री छगन भुजबळ यांना लिहिले होते. हे पत्र समोर आल्यानंतर मनसेने यावर तीव्र आक्षेप नोंदविला.
मनसेच्या मलबार हिल शाखेच्या कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सध्या गॅस सिलेंडरच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या विनंतीमुळे सामान्य नागरिकांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. एका विशिष्ट समाजासाठी असा दबाव आणला जात असून, यामुळे गॅस सिलेंडरचा काळाबाजार होण्याची शक्यता आहे. तसेच, गॅस पुरवठा करणाऱ्या एजन्सींनाही पत्र लिहून या प्रकाराचा निषेध करण्यात आला आहे.
दुसरीकडे, वाढत्या वादावर मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, “माझ्यावर जे आरोप होत आहेत ते राजकीय हेतूने केले जात आहेत. मी माझ्या मतदारसंघापुरती ही विनंती केली होती. कोणत्याही एका विशिष्ट धर्माला प्राधान्य दिलेले नाही. यापूर्वी शिर्डीच्या मंडळालाही सिलेंडर देण्याचे आश्वासन दिले होते. त्याचप्रमाणे जैन समाजाच्या कार्यक्रमालाही सहकार्य करण्यास सांगितले होते. हिंदू सण, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अशा सर्व धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांसाठी मी सहकार्य करतो. हेच सहकार्य पुढेही सुरू राहील.”
दरम्यान, या पत्रामुळे सुरू झालेल्या राजकीय वादात आता गिरगावकर संघटनेसह विविध संघटनांनीही नाराजी व्यक्त केली आहे. पोलिसांनी दिलेल्या तक्रारीची दखल घेऊन पुढील कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.