⚡ ब्रेकिंग News

मंत्रिमंडळातून तीन जणांची विकेट जाणार; सगळे नागडे होतील, अशोक खरात प्रकरणी विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा!

मंत्रिमंडळातून तीन जणांची विकेट जाणार; सगळे नागडे होतील, अशोक खरात प्रकरणी विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा!

'या सगळ्यांना वाचविण्यासाठी खरातचा एनकाउंटर होऊ शकतो'; मंत्र्यांसह अनेक नेत्यांवर गंभीर आरोप, पेन ड्राइव्ह समोर आणण्याची मागणी

मुंबई: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राजकीय वातावरण तापवले आहे. या प्रकरणात आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी खळबळजनक दावे केले आहेत. मंत्रिमंडळातील दोन-तीन जणांची विकेट जाणार असून, या सगळ्यांना वाचविण्यासाठी अशोक खरातचा एनकाउंटर होऊ शकतो, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

'पेन ड्राइव्ह समोर आणा, सगळे नागडे होतील'

विजय वडेट्टीवार म्हणाले, "पेन ड्राइव्ह समोर आणा. सगळे नागडे होतील. मंत्रिमंडळातील दोन-तीन जणांची विकेट जाईल, एवढं मी जबाबदारीने सांगतो. कोणी-कोणी खरातची पायापासून डोक्यापर्यंत सेवा केली, हे समोर येईल. आता या सगळ्यांना वाचविण्यासाठी खरातचा एनकाउंटर होऊ शकतो."

'तटकरेच्या मनात येईल तेव्हाच रुपाली चाकणकरांवर कारवाई'

वडेट्टीवार यांनी रुपाली चाकणकर प्रकरणीही आरोप केले. ते म्हणाले, "जोपर्यंत सुनील तटकरे यांच्या मनात येणार नाही, तोपर्यंत रुपाली चाकणकरांवर कारवाई होणार नाही. तटकरे यांनी चाकणकर यांना वाचविण्याचे काम केले आहे. आता तटकरे आणि प्रफुल पटेल ठरवतील."

'खरात सरकार पुरस्कृत बाबा'

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातने ज्या ठिकाणी विकृतीचा कळस गाठला, त्याचे बांधकाम सरकारी खर्चातून झाल्याचे समोर आले आहे. पर्यटन निधीतून मंदिरासाठी पैसे दिल्याचा आरोप करत खरात हा सरकार पुरस्कृत बाबा असल्याचा दावा आरटीआय कार्यकर्त्यांनी केला आहे.

यावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, "जे सोयीचे आहे ते सरकार समोर आणत आहे. आधी सांगत होते की आमच्या सरकारने पाणी खरातच्या ट्रस्टला दिले. आता त्यांच्या सरकारने ट्रस्टला दीड कोटी रुपये दिले, त्यावर तुम्ही आता बोला. अनेक अधिकाऱ्यांनी, राजकारण्यांनी यामध्ये आपले हात धुवून घेतले आहेत."

'भोंदूबाबा प्रकरणात सर्व नेत्यांची चौकशी व्हावी'

वडेट्टीवार यांनी या प्रकरणातील सर्व नेत्यांची चौकशी करण्याची मागणी केली. ते म्हणाले, "एकंदरीत या भोंदूबाबा प्रकरणात सत्ताधारी किंवा इतरही पक्षाचे नेते आहेत. नाव मी घेणार नाही, पण ते फोटो दिसत आहेत. त्या जिल्ह्यातील, बाजूच्या जिल्ह्यातील मोठमोठे नेते, यापूर्वी महसूल मंत्री राहिलेले नेते, आताच्या मंत्रिमंडळात असलेले नेते देखील आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांचाही फोटो दिसत आहे, दीपक केसरकर यांची काय चौकशी केली? तर सर्वांची चौकशी करायला पाहिजे."

इंधन टंचाई आणि सातारा प्रकरणावरही भडिमार

वडेट्टीवार यांनी इंधन टंचाईच्या मुद्द्यावरही सरकारला घेरले. ते म्हणाले, "इंधन टंचाई आधीपासून होती, मग हुशारकी सरकार का मारत होते? राज्य आणि केंद्र सरकार सांगत होते की कुठेही टंचाई नाही. कोरोनासारखी परिस्थिती आज आहे. मग सर्वपक्षीय बैठक बोलवत आहात. विस्तारित आमदार निवासात डाळ-भात मिळतोय, फक्त गॅस नाहीये. नागपूरमध्ये परिवहन सेवा कोलमडून जात आहे. डिझेल नाहीये, गाड्या कसा चालवणार?"

सातारा जिल्हा परिषद प्रकरणावर बोलताना ते म्हणाले, "काल साताऱ्यात शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की झाली. त्यांची माणसे पळवली गेली. शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र होते, त्यांच्याकडे बहुमत असताना लोक पळवून भाजपने अध्यक्ष-उपाध्यक्ष केले. मंत्र्याच्या हाताला दुखापत झाली. हे तीन डबे कुठे-कुठल्या दिशेने पळत आहेत, हे महाराष्ट्रातील जनता बघत आहे."

वडेट्टीवार यांच्या या आरोपांमुळे राजकीय वातावरण अधिक तापले असून, सत्ताधाऱ्यांकडून यावर काय उत्तर दिले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...