आटपाडी नगरपंचायतीची थकबाकीदारांवर धडक कारवाई! घरपट्टी-पाणीपट्टी थकवली तर नळ बंद
वारंवार सूचना देऊनही कर न भरल्यास जप्ती आणि पाणीपुरवठा खंडित; वसुलीसाठी ६ विशेष पथके सक्रिय, मुख्याधिकारी वैभव हजारे यांचा इशारा
आटपाडी, दि. 7 (प्रतिनिधी) – घरपट्टी व पाणीपट्टी थकविणाऱ्या नागरिकांवर आता आटपाडी नगरपंचायत प्रशासनाने कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. थकबाकीदारांकडून महसूल वसुलीसाठी नगरपंचायतीच्या वतीने विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून, वारंवार सूचना देऊनही कर न भरणाऱ्या थकबाकीदारांचे पाणी नळाद्वारे बंद करणे, जप्तीची कारवाई करणे यासह कठोर पावले उचलण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शहरातील थकबाकीदारांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
३ कोटी ३४ लाखांची थकबाकी, वसुली मोहीम तीव्र
शहरातील नागरी सुविधा सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध व्हावा या उद्देशाने ही मोहीम राबवली जात आहे. आटपाडी नगरपंचायत क्षेत्रात एकूण ७५०० मालमत्ता असून, त्यापैकी मालमत्ता कर (घरपट्टी) १ कोटी ७६ लाख तर पाणीपट्टी १ कोटी ५८ लाख अशी एकूण ३ कोटी ३४ लाखांची मागणी आहे. आतापर्यंत सुमारे १ कोटी ५ लाखांची वसुली करण्यात आली असून, उर्वरित थकबाकीदारांच्या वसुलीसाठी प्रशासनाने जोरदार मोहीम उघडली आहे.
६ विशेष पथके सक्रिय
वसुलीसाठी नगरपंचायतीने ६ विशेष पथके तयार केली असून, ही पथके थकबाकीदारांच्या घरी भेटी देऊन नागरिकांना तात्काळ घरपट्टी व पाणीपट्टी भरण्याचे आवाहन करीत आहेत. वारंवार सूचना देऊनही थकबाकी न भरल्यास संबंधितांचा पाणीपुरवठा नळाद्वारे बंद करण्याची कारवाई करण्यात येत आहे.
मुख्याधिकाऱ्यांचा इशारा
नगरपंचायतीचे मुख्याधिकारी वैभव हजारे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, "शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नागरिकांनी कर भरणे अत्यंत आवश्यक आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता यांसारख्या मूलभूत नागरी सुविधा सुरळीत ठेवण्यासाठी घरपट्टी व पाणीपट्टी वेळेत भरणे गरजेचे आहे. थकबाकी वेळेत न भरल्यास जप्ती किंवा नळ बंद करण्याची कारवाई टाळता येणार नाही." येत्या काळात ही मोहीम अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
नगराध्यक्षांचे आवाहन
आटपाडी नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष यू. टी. जाधव (सर) यांनीही नागरिकांना शहराच्या सर्वांगीण व वैविध्यपूर्ण विकासासाठी कररूपी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी तसेच सर्व नगरसेवकांनी नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन थकबाकी भरून नगरपंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
नगरपंचायत प्रशासनाने सुरू केलेल्या या धडक वसुली मोहिमेमुळे शहरातील थकबाकीदारांवर आर्थिक शिस्त लावण्याची वेळ आली असून, येत्या काही दिवसांत वसुली मोहिमेचा वेग आणखी वाढणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे थकबाकीदारांनी तातडीने कर भरून कारवाई टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
आटपाडी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी वैभव हजारे यांनी थकबाकीदारांवर कारवाईचा इशारा दिला आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.