वर्ध्यात राजकीय नेत्याकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण; अजितदादा गटाच्या नेत्याशी कनेक्शनमुळे खळबळ
७८ वर्षीय दिवाकर गमे याला पोलिसांनी घातली बेड्या; २०२२ पासून नोकरीच्या आमिषावरुन सुरू होतं शोषण
वर्ध्यात राजकीय नेत्याकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण, अजितदादा गटाच्या नेत्याशी कनेक्शनमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
वर्धा: जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संवेदनशील घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) एका दिग्गज नेत्याच्या निकटवर्तीय असलेल्या ७८ वर्षीय ज्येष्ठ नेत्याने अल्पवयीन मुलीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप झाला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पुलगाव पोलिसांनी याप्रकरणी आरोपी दिवाकर गमे याला अटक केली असून त्याच्यावर पॉक्सो कायद्यासह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी २०२२ मध्ये अवघी १७ वर्षांची असताना आरोपीने तिला नोकरीचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढले. गेल्या पाच वर्षांपासून तो तिच्याकडे सातत्याने शारीरिक सुखाची मागणी करत होता. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीचे पीडित मुलीच्या कुटुंबीयांशी जवळचे संबंध होते.
तीन दिवसांपूर्वी आरोपीने पीडितेला अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवून तिचा पुन्हा छळ केला. यामुळे त्रस्त होऊन पीडित मुलीने अखेर धाडस करत पुलगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत ७ मार्च रोजी सायंकाळी आरोपी दिवाकर गमे याला बेड्या ठोकल्या.
आरोपीचा मोबाईल जप्त; राजकीय संबंधांमुळे खळबळ
पोलिसांनी आरोपीचा मोबाईल जप्त केला असून त्यातून आणखी धक्कादायक पुरावे मिळण्याची शक्यता आहे. आरोपी दिवाकर गमे हा यापूर्वी 'महाज्योती' या संस्थेत संचालक म्हणून कार्यरत होता. सध्या तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) एका दिग्गज नेत्याच्या अत्यंत जवळचा असल्याची माहिती समोर आली आहे. या राजकीय कनेक्शनमुळे संपूर्ण प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.