'आता नरेंद्र सरेंडर म्हणण्याची वेळ आली'; पंतप्रधानांवर हर्षवर्धन सपकाळ यांचा टोलादार हल्ला
इराण-इस्रायल संघर्षात भारताचे धोरण अपयशी; एलपीजी संकटाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्याची टीका
आंतरराष्ट्रीय धोरण योग्य नसल्याने भारताला फटका, 'नरेंदर सरेंडर' म्हणण्याची वेळ आलेय: हर्षवर्धन सपकाळ
हिंगोली: इस्रायल-इराण संघर्षाची झळ भारताला बसू लागल्याने निर्माण झालेल्या इंधनसंकटाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "आंतरराष्ट्रीय धोरण चुकीचे असल्याने देशात इंधनासह विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. आता 'नरेंद्र सरेंडर' म्हणण्याची वेळ आली आहे," असे वक्तव्य करत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
कळमनुरी ते हिंगोली दरम्यान शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर ते माध्यमांशी बोलत होते.
'नरेंद्र सरेंडर' म्हणण्याची वेळ का आली?
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, "अमेरिकेसोबत केलेल्या करारांमुळे शेतीव्यवसायाची पीछेहाट होत आहे. आंतरराष्ट्रीय धोरण योग्य नसल्याने इंधनासह अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. सिलिंडरच्या किमती वाढल्या असून इंधनाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार योग्य पद्धतीने काम करत नसल्याने हा आक्रोश आहे. 'नरेंद्र सरेंडर' म्हणण्याची वेळ आलेली आहे, याबद्दल मी दुःख व्यक्त करतो."
ओम बिर्ला यांच्यावरही टीका
यावेळी सपकाळ यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याही कामकाजावर नाराजी व्यक्त केली. "संसदेत सत्ताधाऱ्यांना प्रोत्साहन दिले जाते, तर विरोधकांना बोलू दिले जात नाही. चर्चेलाच वाव दिला जात नाही. संसदीय शब्द उच्चारण्यावरही मर्यादा आणल्या जात आहेत. लोकशाहीला मर्यादित करण्याचा प्रयत्न सुरू आहे," असा आरोप त्यांनी केला.
विश्वचषक विजयानंतरच्या हुल्लडबाजीवर निशाणा
भारताच्या टी-२० विश्वचषक विजयानंतर काही ठिकाणी झालेल्या हुल्लडबाजीबद्दल विचारले असता सपकाळ म्हणाले, "क्रिकेटमधील यशाचा अभिमान असणे क्रमप्राप्त आहे; पण सध्या दिसणारी हुल्लडबाजी दुर्दैवी आहे. पोलिस प्रशासनाचा वचका नसल्याने आणि सरकार हुल्लडबाजांना प्रोत्साहन देत असल्याने विजयाच्या आनंदाच्या क्षणालाही गालबोट लागत आहे. सत्ताधारी विकृत मानसिकता स्पॉन्सर करत आहेत." मात्र, भारतीय संघाचे अभिनंदन करताना ते म्हणाले, "सर्व भारतीय टीमचे अभिनंदन. आगामी काळात प्रत्येक विश्वचषक आपल्याला जिंकायचा आहे."
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.