पूर्वीचे संबंध संपल्यानंतरही छेडछाड सुरूच; पतीला जीवे मारण्याची धमकी दिल्याने संतापलेल्या जोडप्याने केला कट
यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यातील लासीना-वाघापूर शेतशिवारात आढळलेल्या युवकाच्या हत्येचा उलगडा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत करत सर्वांनाच हादरवून सोडले आहे. एकतर्फी प्रेम आणि अनैतिक संबंधांच्या दबावाला कंटाळून पती-पत्नीने एकत्र येऊन युवकाचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे.
शेतशिवारात सापडला होता मृतदेह
लाडखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेर मार्गावर गॅस गोदामाजवळ १५ मार्च रोजी सकाळी एका अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहावर चाकूने वार केल्याच्या जखमा होत्या, तर डोक्यात दगडाने ठेचून अक्षरश: चिखलण्यात आले होते. हत्या करण्यापूर्वी आरोपींनी त्याच्या डोळ्यात मिरचीची पूडही टाकल्याचे स्पष्ट झाले होते. मृत युवकाची ओळख आतिश सुभाषराव देशमुख (वय ३६, रा. गोविंद नगर, यवतमाळ) अशी झाली.
कॉल डिटेल्समुळे उलगडला गुन्हा
पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेने तपासाला सुरुवात केली. मोबाईल कॉल डिटेल्स आणि शेवटच्या संपर्कातील माहितीच्या आधारे संशयाची सुई अंकुश नागोराव खोडे (वय ४३) आणि त्याची पत्नी रुपाली अंकुश खोडे (वय ३८) यांच्याकडे वळली. दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी हत्येची कबुली दिली.
नेमके कारण काय?
तपासात समोर आले की, मृतक आतिशचे आरोपी रुपाली हिच्याशी पूर्वी अनैतिक संबंध होते. मात्र हे संबंध तुटल्यानंतरही आतिश तिला वारंवार त्रास देत होता. तो रुपालीवर पुन्हा संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता, तसेच तिचा नवरा अंकुश याला जीवे मारण्याच्या धमक्या देत होता.
अखेरचा प्रयत्न ठरला शेवटचा
या सततच्या त्रासाला आणि धमक्यांना कंटाळून पती-पत्नीने आतिशला संपवण्याचा प्लॅन आखला. १४ मार्च रोजी रुपालीने आतिशला वाघापूर शेतशिवारात भेटीसाठी बोलावले. तेथे दोघांनी मिळून आधी त्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकली आणि नंतर धारदार शस्त्राने वार करून व दगडाने ठेचून त्याची हत्या केली.
पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे. वैयक्तिक वादातून एखाद्या विवाहित जोडप्याने एकत्र येऊक केलेल्या या निर्घृण हत्येमुळे यवतमाळ जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.