⚡ ब्रेकिंग News

"फक्त जळालेली हाडं सापडली"; कोल्हापूरमध्ये मस्साजोगची पुनरावृत्ती? माजी सरपंच दोन महिन्यांपासून बेपत्ता

"फक्त जळालेली हाडं सापडली"; कोल्हापूरमध्ये मस्साजोगची पुनरावृत्ती? माजी सरपंच दोन महिन्यांपासून बेपत्ता

पाटगावचे माजी सरपंच महेश पिळणकर दोन महिन्यांपासून बेपत्ता; जळालेली हाडं सापडल्याने मस्साजोग प्रकरणाची भीती, कुटुंबीयांचा पोलिसांवर गंभीर आरोप

कोल्हापूरमध्ये बीडच्या मस्साजोग प्रकरणाची पुनरावृत्ती? पाटगावचे माजी सरपंच दोन महिन्यांपासून बेपत्ता, जळालेली हाडं सापडल्याने खळबळ

कोल्हापूर : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्याकांडानंतर आता कोल्हापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाटगावचे माजी सरपंच महेश पिळणकर गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असून त्यांचा अद्याप काहीही मागमूस लागलेला नाही. दरम्यान, पाटगाव भागात काही दिवसांपूर्वी जळालेल्या अवस्थेत काही हाडं सापडल्याने मस्साजोग प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पोलिसांना सर्व माहिती देऊनही तपासात गती नाही

महेश पिळणकर यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांना सर्व माहिती देऊनही तपासामध्ये गती येत नसल्याची तक्रार पिळणकर कुटुंबाने केली आहे. तसेच पोलीस आपल्याला कोणतीही माहिती देत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यामुळे पिळणकर यांच्या कुटुंबीयांसह सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.

जळालेल्या हाडांचा अहवाल प्रतिक्षेत

काही दिवसांपूर्वी पाटगाव भागात जळालेल्या अवस्थेत काही हाडं सापडली होती. या हाडांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. ती हाडं एखाद्या जनावरांची असल्याचं सांगण्यात येत असलं तरी पिळणकर यांच्या बेपत्ता प्रकरणाशी याचा काही संबंध आहे का, याचा तपास केला जात आहे. मात्र अहवाल आल्याशिवाय काहीही स्पष्ट होऊ शकत नाही.

'मस्साजोगपेक्षाही पुढचं प्रकरण'

याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सतिशचंद्र कांबळे यांनी गंभीर भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, "बीडच्या मस्साजोग प्रकरणात पोलिसांनी नेमकं काय घडलं ते सांगितलं होतं. मात्र कोल्हापूरच्या या प्रकरणात पोलीस कोणतीही माहिती देत नाहीत. आम्ही पोलिसांना सर्व मदत केली आहे, मात्र तपासात काहीच प्रगती नाही. त्यामुळं मस्साजोगपेक्षाही पुढं गेलेलं हे प्रकरण आहे."

पोलिसांचं आश्वासन

महेश पिळणकर यांच्या कुटुंबीयांनी कोल्हापूर पोलीस प्रमुख योगेशकुमार गुप्ता यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. पोलिसांनी या तपासासाठी विशेष पथक स्थापन करून लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावण्याचं आश्वासन दिले आहे. महेश पिळणकर हे लोकप्रिय सरपंच होते आणि पाटगाव भागात त्यांची जोरदार चर्चा असायची. नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीची ते तयारी करत होते. त्यामुळं राजकीय आणि इतर सर्वच बाजूंनी तपास केला जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. मात्र जोपर्यंत पिळणकर यांचा ठावठिकाणा लागत नाही तोपर्यंत शंकेची पाल चुकचुकत राहणार आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...