⚡ ब्रेकिंग News

"प्रफुल पटेल त्या लग्नाला नव्हते"; रोहित पवारांच्या आरोपावर राष्ट्रवादीच्या आमदाराचं उत्तर, म्हणाले- 'महाराष्ट्राचा पप्पू' होऊ नका


"प्रफुल पटेल त्या लग्नाला नव्हते"; रोहित पवारांच्या आरोपावर राष्ट्रवादीच्या आमदाराचं उत्तर, म्हणाले- 'महाराष्ट्राचा पप्पू' होऊ नका

रोहित पवारांच्या दिल्ली दौऱ्यावर अनिल पाटलांचा पलटवार; प्रफुल पटेल-व्हीके सिंग संबंधांचे दावे फेटाळले, म्हणाले- "पुरावे सादर करा, राजकारण करू नका"

रोहित पवार विरुद्ध अनिल पाटील; अजित पवार अपघातप्रकरणी आरोप-प्रत्यारोप सुरूच

मुंबई : दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे आमदार रोहित पवार यांनी आज पुन्हा एकदा दिल्ली दौरा करत विविध पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. यादरम्यान त्यांनी व्हीएसआर कंपनीचे मालक व्हीके सिंग आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांच्यातील जवळचे संबंध असल्याचा आरोप केला. मात्र आता या आरोपावरुन राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार अनिल पाटील यांनी रोहित पवारांवर जोरदार पलटवार केला आहे.

प्रफुल पटेल लग्नाला नव्हते - अनिल पाटील

अनिल पाटील यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, प्रफुल पटेल हे व्हीके सिंग यांच्या मुलाच्या लग्नाला उपस्थित नव्हते. ते म्हणाले, "प्रफुल पटेल हे व्ही.के. सिंगच्या मुलाच्या लग्नाला गेलेच नव्हते, मी दाव्यानिशी सांगतो. उगाच त्यांना बदनाम करण्याचा कुणी प्रयत्न करू नये." रोहित पवार केवळ राजकारण करत असून प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांना लक्ष्य करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

'महाराष्ट्राचा पप्पू' होण्याचा इशारा

अनिल पाटील यांनी रोहित पवारांना सल्ला देताना म्हटले, "रोहित पवार केवळ राजकारण करत आहेत. राजकारण करण्यापेक्षा त्यांनी उचित ठिकाणी जाऊन पुरावे सादर करावेत, उगाच इकडे-तिकडे करू नये, अन्यथा महाराष्ट्राचा पप्पू होण्याची वेळ त्यांच्यावर येईल."

रोहित पवार काय म्हणाले होते?

रोहित पवार यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना म्हटले होते की, "विरोधी पक्षांनी दबाव आणल्याशिवाय अजितदादांच्या संशयास्पद विमान अपघाताची निष्पक्ष चौकशी होऊन अजितदादांना न्याय मिळणार नाही. त्यामुळेच देशभरातील विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांना भेटून कोणत्याही परिस्थितीत कुणाच्याही दबावाशिवाय ही चौकशी होण्यासाठी या प्रश्नी आवाज उठवण्याची विनंती त्यांना करतोय." त्यांनी व्हीएसआर कंपनीचे मालक आणि प्रफुल पटेल यांचे जवळचे संबंध असल्याचे म्हटले होते. तसेच, प्रफुल पटेल यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत खुलासा करावा, अशी मागणीही त्यांनी केली होती.

शशिकांत शिंदे यांचा सवाल

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी विधानसभेत या प्रकरणी चर्चा न होण्याबाबत सवाल उपस्थित केला आहे. ते म्हणाले, "विधानसभेत नियम ९७ अन्वये आम्ही अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भाने चर्चा करण्याबाबत विनंती करत आहोत. मागील ४ दिवसांपासून विनंती करतो आहोत. मात्र, अद्याप चर्चेला परवानगी दिली जात नाही. यांच्यावर नेमका कुणाचा दबाव आहे?"

मुख्यमंत्र्यांना भेटणार

अनिल पाटील यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती दिली. ते म्हणाले, "अजित दादांच्या विमान दुर्घटनेबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितला आहे. आम्हाला ज्या शंका आहेत त्या आम्ही त्यांच्याकडे मांडणार आहोत आणि चौकशीची मागणी करणार आहोत."

अजित पवार अपघातप्रकरणी रोहित पवार यांच्या आरोपांनंतर आता अनिल पाटील यांनी केलेल्या पलटवारामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...