तमाशा फड आणि जागरण गोंधळाच्या पार्श्वभूमीवर 'फुला'ची गोष्ट; आटपाडीच्या तरुणांच्या प्रयत्नातून साकारला चित्रपट
सांगली: वाघ्या-मुरळीच्या पारंपरिक लोकसंस्कृतीची कथा सांगणाऱ्या 'फुला' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. अभिनेते सुबोध भावे यांच्या धीरगंभीर आवाजातील टीझरने प्रेक्षकांचे लक्ष वेधले असून, चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण केली आहे. हा चित्रपट १७ एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.
टीझरमध्ये काय दिसलं?
'यत्र नार्यस्तू पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवता' या संस्कृत श्लोकाने सुरू होणाऱ्या टीझरमध्ये एका मुलीच्या अस्तित्वावर निर्माण होणारे प्रश्न अधोरेखित केले आहेत. साखळदंडाने बांधलेली, जमिनीवर आडवी झालेली, आजूबाजूला हळद पडलेली अशी फ्रेम प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण करते.
कोणाची कथा?
'फुला' ही एका मुरळीच्या पोटी जन्मलेल्या निरागस मुलीची संघर्षमय कथा आहे. तमाशा फड, जागरण गोंधळ या महाराष्ट्राच्या पारंपरिक लोकसंस्कृतीच्या पार्श्वभूमीवर ही कथा आकार घेते. समाजाच्या विविध थरांतून जाताना एका मुलीचा संघर्ष या चित्रपटातून मांडला जाणार आहे.
चित्रपटाची टीम
पैलवान अजित शिवाजी जाधव यांनी 'फुला'ची निर्मिती केली आहे. शिवशर्विल मूव्ही आणि बोधी सिनेमा यांची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक जावीर यांनी केले आहे. पटकथा रवीकिरण जावीर यांची आहे. संगीत समाधान ऐवळे यांचे असून, अमर देवकर यांनी सर्जनशील दिग्दर्शन केले आहे. प्रताप जोशी यांनी छायांकन केले असून, राहुल प्रजापती यांचे संकलन आहे.
आटपाडीच्या तरुणांचा प्रयत्न
सांगली जिल्ह्यातील आटपाडीच्या काही तरुणांनी एकत्र येऊन हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट साकारला आहे. चित्रपटात वैशाली सामंत, वैशाली माडे, रोहित राऊत, रवींद्र खोमणे, वैशाली कुलकर्णी, वैष्णवी आदोडे, आकाश नवगिरे यांच्या भूमिका असून, या सर्वांनी गाण्यांनाही आवाज दिला आहे. नृत्य दिग्दर्शन आशुतोष कीर्तिकर आणि सृष्टी जाधव यांचे आहे.
या अनोख्या विषयामुळे आणि सुबोध भावे यांच्या आवाजातील टीझरमुळे 'फुला' चित्रपटाकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले गेले आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.