⚡ ब्रेकिंग News

"महाराष्ट्रातच मराठीला दुसरं स्थान..."; रितेश देशमुखची खंत, विलासरावांची इच्छा सांगताना भावुक झाला अभिनेता


"महाराष्ट्रातच मराठीला दुसरं स्थान..."; रितेश देशमुखची खंत, विलासरावांची इच्छा सांगताना भावुक झाला अभिनेता

 मराठी सिनेमांकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत; हिंदी-मराठी सिनेमातील आर्थिक दरीवर केले स्पष्ट भाष्य

मुंबई: मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख नुकत्याच एका कार्यक्रमात बोलताना भावुक झाला. समाजवादी पक्षाच्या 'व्हिजन इंडिया' कार्यक्रमात बोलताना रितेशने महाराष्ट्रातच मराठी सिनेमांकडे होणाऱ्या दुर्लक्षाबद्दल खंत व्यक्त केली. तसेच त्याचे वडील आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची एक इच्छाही त्याने यावेळी बोलून दाखवली.

दादासाहेब फाळकेंपासूनचा प्रवास

रितेश म्हणाला, "सिनेसृष्टीचा जन्म महाराष्ट्रात, मुंबईत झाला आणि एका मराठी माणसाने, दादासाहेब फाळके यांनी 100 वर्षांपूर्वी या सिनेसृष्टीची सुरुवात केली. मला कोणताही वाद निर्माण करायचा नाही, पण महाराष्ट्रातच मराठी सिनेमाकडे दुर्लक्ष होत आहे."

मराठी सिनेमांकडे का होते दुर्लक्ष?

रितेशने सांगितले की, कर्नाटक किंवा केरळमध्ये तिथल्या स्थानिक चित्रपटांना पहिलं प्राधान्य दिलं जातं. महाराष्ट्रात 10 ते 11 कोटी लोक मराठी बोलतात, ही संख्या अनेक दाक्षिणात्य राज्यांच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे. तरीही तिथे प्रादेशिक सिनेमा जसा जोमाने व्यवसाय करतो, तसा तो महाराष्ट्रात करत नाही. "आपल्याकडे प्रेक्षकांची पहिली पसंती हिंदी असते. इथे मराठीला दुसरं स्थान दिलं जातं, मराठी सिनेमांकडे दुर्लक्ष केलं जातं," अशी खंत रितेशने व्यक्त केली.

आर्थिक तुलनेवर भाष्य

मराठी सिनेमे मागे पडण्याचं खरं कारण हिंदी आणि मराठी सिनेमामधील आर्थिक तुलना असल्याचं रितेश म्हणाला. "मराठी सिनेमे 3 ते 7 कोटींमध्ये बनवले जातात, पण हिंदी सिनेमा करायचा म्हटलं तर त्यासाठी 100 कोटी रुपये लागतात. साहजिकच एकाच दरात भव्य हिंदी सिनेमा पाहण्याचा पर्याय उपलब्ध असल्याने प्रेक्षक तिकडे वळतात," असे तो म्हणाला.

विलासरावांची इच्छा

कार्यक्रमात बोलताना रितेशने आपले वडील विलासराव देशमुख यांची आठवण काढताना भावुक झाला. तो म्हणाला, "मी जेव्हा निर्मिती क्षेत्रात आलो, तेव्हा माझे वडील म्हणाले होते की, 'तू हिंदीत काम करतोस, पण मराठी सिनेमासाठी काय करतोयस?' म्हणूनच माझ्या कंपनीने सहा चित्रपट बनवले, ते सुद्धा सगळे मराठीत. आपल्या प्रदेशातील कथा आपल्याच लोकांसाठी मोठ्या पडद्यावर मांडणे ही आपली जबाबदारी आहे."

रितेशच्या या भावनिक आणि परखड मतांवर चाहते आणि मराठी सिनेप्रेमींमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...