गौतमी पाटीलचा ठसका आता 'लाडकी बहीण'मध्ये! गवळणीच्या ठेक्यावर थिएटर थिरकणार
स्मिता तांबे मुख्य भूमिकेत; सरकारी योजनेच्या पार्श्वभूमीवर कौटुंबिक मनोरंजनाचा खजिना घेऊन येतोय 'लाडकी बहीण' चित्रपट
"१५०० रुपये हप्ता आमच्या संसारात लाखापेक्षा भारी" अशा आगळ्या संदेशासह मराठी चित्रपटसृष्टीत एक नवा प्रयोग रसिकांच्या भेटीला येत आहे. महाराष्ट्रात सध्या चर्चेत असलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. 'लाडकी बहीण' या नावानेच तयार झालेला हा चित्रपट १७ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
कलाकारांची फळी
दिग्दर्शिका शितल शिंदे यांनी शुभम फिल्म प्रोडक्शन आणि शनिदेव फिल्म्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात अभिनयाचा ठसका उमटवणाऱ्यांची नावे म्हणजे स्मिता तांबे, सुरेखा कुडची, उषा नाडकर्णी, उषा नाईक, गौतमी पाटील, रुक्मिणी सुतार (सरू आजी), सारिका जाधव, पूनम कापसे, माधव अभ्यंकर, शशांक शेंडे, अनिल नगरकर, सुरेश विश्वकर्मा, सिद्धेश्वर झाडबुके, गणेश शिंदे, दर्शना जोकरे, मेगा शिंदे आदी.
गौतमी पाटीलची गवळण ठरणार आकर्षण
या चित्रपटातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे लावणीसम्राज्ञी गौतमी पाटीलची गवळण. गवळणीच्या ठेक्यावर प्रेक्षक थिरकतील याची खात्री निर्मात्यांनी दिली आहे. तिच्या या धमाकेदार अभिनयामुळे चित्रपटाला आणखी रंगत येणार आहे.
काय आहे कथा?
हा चित्रपट केवळ शासकीय योजनेवर भाष्य करणारा नसून, सर्वसामान्य महिलांच्या जीवनातील संघर्ष, त्यांचे प्रश्न आणि त्यावरचे उत्तर याभोवती फिरतो. 'एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ' या उक्तीचा अवलंब करीत गोरगरीब महिला एकत्र येतात आणि कशा प्रकारे आपला उत्कर्ष साधतात हा महत्त्वपूर्ण पैलू या चित्रपटात मांडण्यात आला आहे.
तंत्रज्ञांची कामगिरी
चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद गणेश शिंदे यांनी लिहिले आहेत. बाबासाहेब पाटील कार्यकारी निर्माते असून, प्रताप गंगावणे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. चिनू चेतन यांनी नृत्य दिग्दर्शन केले असून, विनीत देशपांडे यांचे संगीत आहे. शेखर मते आणि पंकज चव्हाण यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे. उमेश गवळी, आनंद शिंदे आणि गायत्री शेलार यांच्या आवाजातील गाणी चित्रपटाची शोभा वाढवणार आहेत.
दिग्दर्शिकेचा विश्वास
दिग्दर्शिका शितल शिंदे म्हणाल्या, "सरकारी कार्यालयांपासून सर्वसामान्यांच्या घरांपर्यंत सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेला हा महत्त्वपूर्ण विषय आम्ही हसत-खेळत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आशयघन गोष्ट, उत्कंठावर्धक घडामोडी, सर्वसामान्यांच्या भावना, सुमधूर गीत-संगीत, बहारदार नृत्य, लक्षवेधी अभिनय आणि एक सशक्त संदेश देत हा चित्रपट संपूर्ण कुटुंबाचे परिपूर्ण मनोरंजन करेल याची खात्री आहे."
'लाडकी बहीण' चित्रपटाचे पोस्टर आणि कलाकार. चित्रपट १७ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.