पश्चिम आशियातील संघर्षाचा भारतावर परिणाम; १ कोटी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न
'आम्ही एका इराणी जहाजाला आश्रय दिला आहे, आखाती देशात पुरवठा साखळी बाधित झाली आहे'; परराष्ट्र मंत्र्यांनी संसदेत कोणकोणती माहिती दिली?
नवी दिल्ली: पश्चिम आशियातील वाढत्या भूराजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर आज (९ मार्च) संसदेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. या प्रश्नांना उत्तर देताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. भारताने मानवतावादी दृष्टिकोनातून एका इराणी जहाजाला आश्रय दिला असून, आखाती देशांमध्ये पुरवठा साखळी बाधित झाल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पश्चिम आशियातील अस्थिरतेमुळे भारताच्या ऊर्जा गरजा आणि तेथील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती. भारत आपल्या ५५ टक्के ऊर्जा गरजा पश्चिम आशियातून पूर्ण करतो. तसेच आखाती देशांमध्ये सुमारे १ कोटी भारतीय कार्यरत असून अलीकडच्या संघर्षात अनेक भारतीयांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती खरगे यांनी दिली.
जयशंकर काय म्हणाले?
विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देताना परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले, "पश्चिम आशियातील तणावामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. सरकार सर्व हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहे. भारत आपली ऊर्जा गरज आणि १ कोटी नागरिकांच्या सुरक्षेसाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. या संघर्षात मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल आम्ही संवेदना व्यक्त करतो."
पंतप्रधान मोदी गल्फ देशांच्या संपर्कात
परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः गल्फ देशांच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. "पंतप्रधान मोदी गल्फ देशांच्या नेत्यांशी संपर्कात असून डिप्लोमॅटिक चॅनेलद्वारे चर्चा सुरू आहे. भारत सरकार प्रभावित देशांच्या आणि इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या सतत संपर्कात आहे. भारताने शांततेचा मार्ग स्वीकारला असून, मानवतावादी दृष्टिकोनातून इराणच्या एका जहाजाला आश्रय दिला आहे," अशी माहिती जयशंकर यांनी दिली.
सुरक्षा समितीच्या बैठकीत चर्चा
सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीच्या (CCS) बैठकीत मिडिल ईस्टची परिस्थिती आणि भारतीयांच्या सुरक्षेवर सविस्तर चर्चा करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
जानेवारीपासूनच जारी होता अलर्ट
सरकारने स्पष्ट केले की, जानेवारी महिन्यापासूनच भारतीयांना सावध करण्यात आले होते. *"२८ फेब्रुवारीपासून तणाव वाढला असला तरी, जानेवारीतच भारतीय दूतावासाने नागरिकांना सतर्क केले होते. इराणमधील भारतीयांना वेळेत देश सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या आणि दूतावास सतत त्यांच्या संपर्कात आहे,"* असे जयशंकर यांनी सांगितले.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.