बिर्याणीच्या बिलाने उघडकीस आला ७० हजार कोटींचा करचोरी प्रकरण; देशभरात असे चालवले होते रॅकेट
नवी दिल्ली: डिजिटल युगातही करचोरीचे प्रमाण थांबलेले नाही, मात्र तंत्रज्ञानाचाच वापर करून अशा फसवणुकीचा पर्दाफाश करणेही आता शक्य झाले आहे. अशाच एका मोठ्या करचोरी प्रकरणाचा उलगडा हैदराबादमधील एका रेस्टॉरंटमधील बिर्याणीच्या बिलामुळे झाला आहे. या एका बिलाच्या तपासणीतून देशभरातील लाखो रेस्टॉरंटमध्ये सुरू असलेल्या सुमारे ७० हजार कोटी रुपयांच्या करचोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
हैदराबादमधील एका रेस्टॉरंटमध्ये आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियमित तपासणी केली असता, एक विसंगती त्यांच्या निदर्शनास आली. हा छापा नव्हता, तर सामान्य पाहणी होती. रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांची गर्दी असूनही, बिलिंग सिस्टममध्ये त्याची नोंद दिसत नव्हती. काही रोख बिले सिस्टममध्ये क्षणभर दिसून येत होती आणि लगेचच गायब होत होती. प्रिंट केलेला अहवाल योग्य असल्याचे दिसत होते, मात्र सॉफ्टवेअरच्या लॉगमध्ये वेगळीच माहिती नोंदवली गेली होती. ही केवळ चूक नसून, हे सुनियोजित पद्धतीने करचोरी केली जात असल्याचे स्पष्ट झाले.
सॉफ्टवेअरद्वारे चालवला होता घोटाळा
सुरुवातीला ही स्थानिक चूक असल्याचा संशय होता, मात्र तपास अधिक खोलवर गेला असता, हे प्रकरण अनेक राज्यांतील रेस्टॉरंटशी निगडीत असल्याचे आढळून आले. या सर्व रेस्टॉरंटमध्ये एकच बिलिंग सॉफ्टवेअर वापरले जात असल्याचे समोर आले. यानंतर चौकशीचा धागा सॉफ्टवेअर प्रदात्याच्या अहमदाबादस्थित मुख्य कार्यालयापर्यंत पोहोचला, जिथे देशभरातील १ लाख ७७ हजार रेस्टॉरंटचा सुमारे ६० टेराबाइट इतका प्रचंड डेटा उपलब्ध झाला.
एआयच्या सहाय्याने उघडकीस आली बिले
हैदराबादमधील डिजिटल लॅबमधील तज्ञांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) टूल्सच्या साहाय्याने हटवण्यात आलेली बिले पुनर्प्राप्त केली. तपासात असे दिसून आले की, २०१९ पासून सहा वर्षांच्या कालावधीत या रेस्टॉरंटमध्ये अंदाजे २.४३ लाख कोटी रुपयांची बिले तयार करण्यात आली होती. यापैकी १३ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची बिले नोंद झाल्यानंतर लगेचच हटवण्यात आली होती. काही रेस्टॉरंट दररोज ठरावीक रोख बिले हटवत होते, तर काहींनी एकाच वेळी संपूर्ण महिन्याची बिले हटवल्याचेही आढळून आले. यामागचा उद्देश स्पष्ट होता - प्रत्यक्ष विक्री दर्शवण्याऐवजी ती कमी दाखवून कमी कर भरणे.
कोणत्या राज्यात किती करचोरी?
तपासात विविध राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात करचोरी झाल्याचे उघड झाले आहे.
कर्नाटक: सुमारे २,००० कोटी रुपयांचे व्यवहार दडपल्याचे आढळले.
तेलंगणा: अंदाजे १,५०० कोटी रुपयांचे व्यवहार लपवण्यात आले.
तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात: या राज्यांमध्येही मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली.
आंध्र प्रदेश आणि तेलंगणा: येथील ३,७३४ पॅनच्या तपासणीत ५,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची दडपलेली विक्री उघड झाली. फक्त ४० रेस्टॉरंटच्या नमुन्यात, सुमारे ४०० कोटी रुपयांची अघोषित उलाढाल आढळून आली.
एकूणच, देशभरात सरासरी २७ टक्के विक्री दडपली जात असल्याचे या तपासात दिसून आले. परिणामी, अंदाजे ७० हजार कोटी रुपयांची छुपी उलाढाल लपवण्यात आली, ज्यामुळे प्रचंड प्रमाणात महसुलाचे नुकसान झाल्याची शक्यता आहे.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपासाची व्याप्ती वाढवली आहे. विभाग आता पुनर्निर्मित बिलांची कर विवरणपत्रे आणि बँक रेकॉर्डशी जुळणी करत आहे. संबंधित रेस्टॉरंट मालकांना लवकरच नोटिसा बजावून दंडात्मक कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
.jpeg)
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.