'राजा शिवाजी'चा फर्स्ट लूक लाँच; रितेश देशमुखच्या हाती समशेर, चेहऱ्यावर शिवतेज
- शिवजयंतीच्या मुहूर्तावर पॅन इंडिया चित्रपटाची घोषणा; १ मे रोजी प्रदर्शन
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिनेते रितेश देशमुख यांनी त्यांच्या महत्त्वाकांक्षी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करत चाहत्यांना मोठी भेट दिली आहे. 'राजा शिवाजी' असे नाव असलेल्या या चित्रपटात रितेश देशमुख पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत झळकणार आहेत. यानिमित्ताने प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये रितेशच्या हाती समशेर असून चेहऱ्यावर शिवरुप तेज दिसत आहे. या लूकने चाहत्यांचे मन जिंकले असून सोशल मीडियावर त्याचे जोरदार कौतुक होत आहे.
शिवजयंतीच्या दिवशी मोठी घोषणा
शिवजयंतीच्या पावन दिनी रितेश देशमुखने सोशल मीडियावर पोस्टर शेअर करत चित्रपटाची माहिती दिली. त्याने लिहिले, "आज तोच दिवस आहे, जेव्हा पहिल्यांदा अंधाराला एका प्रकाशाचं स्वप्न पडलं. इतिहासानं जेव्हा भविष्याकडे पाऊल उचललं. याच दिवशी आपल्या मातीला नवा स्वाभिमान मिळाला. शिवजयंतीच्या शुभ प्रसंगी जीओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी सादर करीत आहोत, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित 'राजा शिवाजी' या भव्य चित्रपटाचं पहिलं पोस्टर. आपला राजा, आपला अभिमान."
'वेद' चित्रपटानंतर रितेश देशमुख पुन्हा एकदा मोठ्या प्रकल्पासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यापूर्वी त्याच्या 'वेद' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता 'राजा शिवाजी' चित्रपटाद्वारे तो आपल्या कारकिर्दीतील सर्वात मोठा प्रकल्प घेऊन येत आहे.
पॅन इंडिया सिनेमा; दमदार कलाकारांची फौज
'राजा शिवाजी' हा केवळ मराठी भाषेतून नव्हे तर अनेक भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मराठी सिनेसृष्टीतील हा पहिला भव्य पॅन इंडिया प्रकल्प ठरणार आहे. चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी ज्योती देशपांडे आणि जेनेलिया देशमुख यांच्याकडे आहे. रितेश देशमुख यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शनही स्वतः केले आहे.
चित्रपटात रितेश देशमुख यांच्यासोबत अभिषेक बच्चन, संजय दत्त, जेनेलिया देशमुख यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार मुख्य भूमिकेत असणार आहेत. अशा दमदार कलाकारांच्या फौजेमुळे चित्रपटाची प्रतिक्षा आणखी वाढली आहे. अजय-अतुल या सुप्रसिद्ध संगीतकार जोडीने चित्रपटाला संगीत दिले असून त्यामुळे चित्रपटाची भव्यता आणखी खुलणार आहे.
१ मे रोजी चित्रपट प्रदर्शन
'राजा शिवाजी' चित्रपट महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यगाथेचे आणि पराक्रमाचे भव्य दर्शन घडवण्यात येणार आहे. अनेक दिग्गज कलाकारांच्या सहभागामुळे आणि पॅन इंडिया स्वरूपामुळे या चित्रपटाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
.jpg)
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.