ती सध्या काय करते' फेम बालकलाकाराचं 4 महिन्यांनंतर पुनरागमन; टक्कल करून का दिसली निर्मोही?
- लहानगी तन्वी म्हणून घराघरात पोहोचलेली निर्मोही अग्निहोत्री अचानक सोशल मीडियावर आली समोर; चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न
मुंबई:'-- ती सध्या काय करते' या गाजलेल्या चित्रपटातील लहानगी तन्वी म्हणजेच बालकलाकार निर्मोही अग्निहोत्री सध्या चर्चेत आहे. सुमारे चार महिन्यांनंतर तिने सोशल मीडियावर पुनरागमन केले असून तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र या व्हिडिओमध्ये तिने पूर्णपणे केस कापल्याने चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
चार महिने का होती गायब?
निर्मोही अग्निहोत्री ही एक कथ्थक नृत्यांगना असून ती आपल्या नृत्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. मात्र सप्टेंबर २०२५ नंतर तिने एकही व्हिडिओ पोस्ट केला नव्हता. प्रदीर्घ काळ ती सोशल मीडियापासून दूर होती. आता चार महिन्यांनंतर तिने पुनरागमन केले असून तिचा नवा व्हिडिओ चर्चेत आला आहे.
टक्कल करून का दिसली निर्मोही?
निर्मोहीने नकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती कथ्थक नृत्य करताना दिसत आहे. मात्र या व्हिडिओत तिने पूर्णपणे केस कापल्याने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. तिने नेमके केस का कापले? तिची प्रकृती ठीक आहे का? एखाद्या आगामी प्रोजेक्टसाठी तिनं हे केले आहे का? असले अनेक प्रश्न नेटकऱ्यांनी तिच्या कमेंट सेक्शनमध्ये विचारले आहेत. मात्र याबाबत तिने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.
ती सध्या काय करते' मधून मिळाली प्रसिद्धी
२०१७ साली प्रदर्शित झालेल्या 'ती सध्या काय करते' या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते. पहिल्या प्रेमाच्या आठवणी जागवणाऱ्या या चित्रपटातील बालकलाकारांचे विशेष कौतुक झाले होते. तेजश्री प्रधान आणि अंकुश चौधरी यांनी मुख्य भूमिका साकारलेल्या या चित्रपटात तन्वीची लहानपणीची भूमिका निर्मोही अग्निहोत्रीने साकारली होती. तर किशोरवयीन तन्वीची भूमिका आर्या आंबेकर हिने साकारली होती. निर्मोहीच्या निरागस अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते.
चित्रपटानंतर मात्र निर्मोही मोठ्या पडद्यापासून दूर राहिली. ती कथ्थक नृत्यात स्वतःला गुंतवून होती. आता अचानक झालेल्या या बदलामुळे आणि दीर्घकाळानंतर समोर आल्यामुळे चाहते तिच्या या नव्या लुकबद्दल उत्सुक आहेत.

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.