अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त लष्करी कारवाईत तेहरानसह अनेक शहरं भरल्या स्फोटांनी; इराणचा ४०० क्षेपणास्त्रांनी प्रत्युत्तराचा प्रयत्न
क्रांती न्यूज वृत्तांत:
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर केलेल्या धमकीनंतर आज (शुक्रवारी) भारतीय वेळेनुसर पहाटे मोठी लष्करी कारवाई घडवून आणली आहे. इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे केलेल्या या हल्ल्यात इराणची राजधानी तेहरानसह अनेक शहरांना लक्ष्य केले गेले. तेहरानमध्ये स्फोटांचे मोठ आवाज ऐकू आले, तर हवाई हल्ल्याचे सायरन वाजल्याच्या घटना घडल्या.
अल जझीराने अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, ही अमेरिका आणि इस्रायलमधील संयुक्त लष्करी कारवाई आहे. या हल्ल्यात तेहरानमधील गुप्तचर मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, सर्वोच्च नेते अली खमेनी यांचं कार्यालय आणि इराणी अणुऊर्जा संघटना या महत्त्वाच्या प्रतिष्ठानांना लक्ष्य केल्याचं वृत्त आहे. हल्ल्यानंतर तातडीने सर्वोच्च नेते खमेनी यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. या कारवाईनंतर इराणनेही इस्रायलवर सुमारे ४०० क्षेपणास्त्रे डागून प्रत्युत्तर दिलं आहे.
ट्रम्प यांचा दर्पोक्तीपूर्ण इशारा:
अणुशस्त्रांबाबत इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या वाटाघाटीदरम्यानच ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी यापूर्वीच इराणवर हल्ला करण्याची जोरदार धमकी दिली होती. त्यांनी स्पष्ट केलं की, अमेरिकेची ही कारवाई मोठी आणि सतत सुरू राहील. "या कारवाईचा उद्देश अमेरिका आणि तिच्या लोकांना धोक्यापासून वाचवणे आहे. आमचं सैन्य इराणची क्षेपणास्त्रं आणि त्यांचा संपूर्ण क्षेपणास्त्र कार्यक्रम उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे," असं ट्रम्प म्हणाले.
त्यांनी इराण नौदलाला लक्ष्य करत म्हटलं की, "आम्ही इराण नौदलाचा विनाश करू." तसेच इराणला अण्वस्त्रे मिळू नयेत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
जून हल्ल्याचा संदर्भ:
ट्रम्प यांनी पुढे म्हटलं की, जून २०२५ मध्ये इराणच्या अणुस्थळांवर झालेल्या हल्ल्यानंतरही इराण आपला अणुकार्यक्रम पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. इराणने अणुकार्यक्रम सोडण्याचा पर्याय न स्वीकारल्याने आता आणखी वाट पाहणं योग्य नाही, असं ते म्हणाले. या लष्करी कारवाईदरम्यान काही अमेरिकन सैनिकांना आपले प्राण गमवावे लागू शकतात, हे मान्य करतानाच भविष्यातील सुरक्षिततेसाठी हे पाऊल आवश्यक असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांवरून तणाव:
इराण आणि अमेरिकेदरम्यान सुरू असलेल्या अणुकरार वाटाघाटींमध्ये इराणचा बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रकल्प हा सर्वात मोठा वादाचा मुद्दा बनला आहे. इराण या मुद्द्यावर कोणतीही तडजोड करण्यास तयार नसून, हा त्यांच्या संरक्षणासाठी आवश्यक असल्याची भूमिका घेतली आहे. जून २०२५ मध्ये इस्रायल आणि अमेरिकेने इस्रायलमधील अणुस्थळांवर केलेल्या हल्ल्यावेळी इराणच्या क्षेपणास्त्रांनीच संरक्षण केल्याचा दावा इराणकडून करण्यात आला आहे.
इराणचा प्रत्युत्तरात्मक हल्ला:
दुसरीकडे, इस्रायली सैन्याने माहिती दिली आहे की इराणकडून डागण्यात आलेली क्षेपणास्त्रं इस्रायलच्या दिशेने येत असल्याचं आढळून आलं. त्यामुळे इस्रायलच्या उत्तर भागासह अनेक ठिकाणी सायरन वाजले आणि स्फोट ऐकू आले. इस्रायली हवाई संरक्षण प्रणालीद्वारे ही क्षेपणास्त्रं रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या हल्ल्यात झालेल्या नुकसानीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.