भिगवण अपहरण प्रकरणाला नाट्यमय वळण! "अपहरण झालेच नाही, मी स्वतःच्या मर्जीने गेले"; तरुणीचा प्रतिज्ञापत्राद्वारे मोठा खुलासा
भिगवण/बारामती | २० फेब्रुवारी २०२६: पुणे जिल्हयातील इंदापूर तालुक्यात खळबळ उडवून देणाऱ्या भिगवण येथील 'तरुणी अपहरण' प्रकरणाला आता पूर्णपणे वेगळे वळण मिळाले आहे. ज्या तरुणांवर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता, त्यांच्यासोबत आपण स्वतःच्या राजीखुषीने गेल्याचे संबंधित २१ वर्षीय तरुणीने स्पष्ट केले आहे. बारामती पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर तरुणीने प्रतिज्ञापत्राद्वारे (Affidavit) आपली भूमिका मांडली असून, आईने दिलेली फिर्याद खोटी असल्याचे म्हटले आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
मंगळवारी (१७ फेब्रुवारी) दुपारी ४ च्या सुमारास भिगवण येथे आई आणि भावासोबत लग्नाची खरेदी करून घरी परतत असताना या तरुणीचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. डोळ्यांत मिरचीपूड टाकून आणि मारहाण करून दोन सख्ख्या भावांनी तिला टेम्पोतून नेल्याचा आरोप आईने केला होता. या घटनेनंतर भिगवणमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आणि पुणे-सोलापूर हायवेवर ठिय्या आंदोलनही करण्यात आले होते.
तरुणीचा प्रतिज्ञापत्रातील धक्कादायक खुलासा
बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झालेल्या तरुणीने प्रशासनासमोर महत्त्वाचे दावे केले आहेत:
प्रेमसंबंधांची कबुली: "माझे संबंधित मुलावर प्रेम असून आम्ही गेल्या एक वर्षापासून एकमेकांच्या संपर्कात आहोत. मी घरच्यांना याबद्दल सांगितले होते, मात्र त्यांनी दुसऱ्या मुलाशी माझे लग्न ठरवले (२२ फेब्रुवारीला लग्न होते). त्यामुळे मी स्वतःच्या मर्जीने घर सोडले."
मिरचीपुडीचा दावा खोटा: "आई आणि भावाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून किंवा दागिने हिसकावून माझे अपहरण केल्याची फिर्याद पूर्णपणे खोटी आणि बनावट आहे. कोणाच्या तरी दबावाखाली येऊन ही तक्रार देण्यात आली आहे."
सज्ञान असल्याचे स्पष्टीकरण: "मी २१ वर्षांची असून सज्ञान आहे. मला माझ्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे."
पोलिसांचा तपास आणि प्रवासाचा मार्ग
मिळालेल्या माहितीनुसार, घर सोडल्यानंतर संबंधित तरुण-तरुणीने श्रीगोंदा, अहिल्यानगर, शिक्रापूर, पुणे आणि सासवड असा प्रवास करत महाबळेश्वर गाठले. तिथून २१ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १:३० वाजता ते बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी मुलीच्या कॉल डिटेल्सची तपासणी केली असता, गेल्या एक महिन्यापासून दोघांमध्ये सतत बोलणे होत असल्याचे समोर आले आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव मित्र अज्ञातस्थळी
मुलीच्या जबाबांनंतर पोलिसांनी तिला कायदेशीर प्रक्रियेसाठी ताब्यात घेतले आहे, तर तिच्यासोबत असलेल्या तरुणाला सुरक्षेच्या कारणास्तव अज्ञात स्थळी हलवण्यात आले आहे. या प्रकरणात कोणताही जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी सहा पथके तैनात केली असून सोशल मीडियावर अफवा न पसरवण्याचे आवाहन केले आहे.
.jpeg)
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.