जनतेचे भरभरून प्रेम मोठी पूंजी; पराभवाची चिंता न करता विधानसभेच्या रणधुमाळीत उतरणार – अभयसिंह जगताप
कातरखटाव : जिल्हा परिषद निवडणुकीत जय-पराजयापेक्षा मतदारांचे मिळालेले अपार प्रेम हीच खरी पूंजी असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप यांनी केले. अवघ्या पाच दिवसांच्या कालावधीत सुमारे बारा हजार मतदारांचे नेतृत्व करू शकल्याचा आनंद असून, विरोधी पक्षाच्या अडचणींवर मात करत जनता आपल्या पाठीशी ठामपणे उभी राहिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
कातरखटाव येथील कात्रेश्वर मंगल कार्यालयात आयोजित आभार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते प्रा. अर्जुनराव खाडे, डॉ. महेश गुरव, उपसभापती विजयराव शिंदे, नाना पुजारी, सदाशिव खाडे, अजय सानप, मकरंद बोडके, डॉ. प्रशांत गोडसे, शकील मुजावर, रवींद्र खाडे, तानाजी बागल, जयकुमार बागल, मुन्ना खाडे, शंकर फडतरे, पंढरीनाथ खाडे, राहुल निकम, अर्जुन दुबळे, धनाजी चव्हाण, सुनील खाडे, शशिकांत देशमुख, जयवंत खाडे, धनाजी लवळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अभयसिंह जगताप पुढे म्हणाले, "निवडणुकीच्या तोंडावर मोठी माणसे सोबत नसतानाही सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर ही लढाई लढलो. पराभव झाला तरी लढताना खडा न लागण्याचे समाधान आहे. पराभवामुळे खजू न करता आता विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीला सुरुवात करू."
पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले, "आता जातीपातीच्या राजकारणाला मुठमाती देत विचारधारेवर आधारित संघटना उभी करू. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराने कार्य करणाऱ्यांनाच निवडणुकीत बळ देणार आहोत. चुकीच्या धोरणांविरुद्ध प्रसंगी रस्त्यावर उतरूनही लढा देऊ."
येत्या काळात होणाऱ्या ग्रामपंचायत, सोसायटी आणि इतर निवडणुका पूर्ण ताकदीने लढविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. "गर्दीपेक्षा प्रामाणिक माणसं माझ्यासोबत आहेत, याचा सार्थ अभिमान आहे. जनतेला दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहीन," अशी ग्वाही देत अभयसिंह जगताप यांनी उपस्थित कार्यकर्त्यांचे आभार मानले.

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.