क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे
मुंबई - राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ (Drought) जाहीर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या आदेशानंतर याबाबतचा शासन निर्णय काढण्यात आला असून महाराष्ट्रातील तब्बल ७५ टक्के भागात दुष्काळ जाहीर झाला आहे.
सरकारने दुष्काळ जाहीर केल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया देत काही प्रश्न उपस्थित केले होते. यावरूनच मंत्री उदय सामंत यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला होता. "घरातून आता बाहेर पडलेत, त्यांचे अभिनंदन," असे उदय सामंत म्हणाले होते.
आता उदय सामंत यांच्या या टीकेला ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी अत्यंत आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिले आहे.
उदय सामंत यांच्यावर जोरदार हल्लाबोल करताना भास्कर जाधव म्हणाले की, "बाजार बुणगे सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांचे दुःख कळणार नाही. माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्याचे अश्रू पुसायला सरकारला भाग पडणार."
"ठाकरे घरातून बाहेर पडत नाहीत, असं सत्ताधारी लोकांचे तुणतुणे कायम असतं. पण उदय सामंत यांनी ठाकरेंना बोलण्यापेक्षा दुष्काळग्रस्त भागात जिल्ह्यातले केवळ तीन तालुके आलेत, याची जबाबदारी घेतली पाहिजे," अशी टीका त्यांनी केली.
"मुख्यमंत्र्यांना सामंत जाब विचारणार आहेत का?" असा थेट सवालही भास्कर जाधव यांनी केला.
"ठाकरेंवर टीका करून तुमची पापं झाकली जाणार नाहीत," अशी टीका त्यांनी केली.
सिंधुदुर्गातील जमीन परप्रांतीय लोकांना विकल्या संदर्भातील आरोपांवर बोलताना आमदार भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्र्यांकडे थेट चौकशीची मागणी केली आहे.
"परप्रांतीय लोकांना जमीन देण्यासाठी दलाली करणारा मंत्री कोण, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः समोर येऊन महाराष्ट्राला सांगावे," अशी मागणी त्यांनी केली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, "फडणवीस मंत्र्याला पाठीशी घालतील, पण त्याचे नाव सांगणार नाहीत."
तसेच खासदार संजय राऊत यांनी केलेला आरोप गंभीर असून मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली पाहिजे, असेही जाधव म्हणाले.
रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडल्यानंतर आमदार भास्कर जाधव यांनी निधी वाटपावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत.
"रत्नागिरी जिल्ह्यात आपण एकमेव विरोधी आमदार असून निधी वाटपात दुजाभाव केला जात आहे," असा आरोप त्यांनी केला.
आपण प्रतिनिधित्व करत असलेल्या गुहागर तालुक्यातील एका माजी आमदाराला आपल्यापेक्षा चारपट निधी देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
डीपीडीसीची बैठक किमान तीन महिन्यांतून एकदा होणे अपेक्षित असल्याचे सांगताना त्यांनी नमूद केले की, पाऊस आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बैठक लांबत गेली आणि तब्बल आठ महिन्यांनंत डीपीडीसीची बैठक झाली.
"सध्या लोकप्रतिनिधी नसलेल्या आणि ग्रामपंचायत सदस्यही नसलेल्या एका माजी आमदाराला चार कोटी रुपयांचा निधी दिला," असा आरोप त्यांनी केला.
"रत्नागिरी जिल्ह्यातील दहा माजी आमदारांनाही निधीचे वाटप करावे," अशी मागणी आपण डीपीडीसीच्या बैठकीत केल्याचे जाधव यांनी सांगितले.
डीपीडीसीकडून सदस्यांना देण्यात आलेल्या पुस्तिकेतील काही योजनांकडे लक्ष वेधत, पुस्तिकेतील अनेक योजनांमध्ये एक रुपयाही निधी खर्च झालेला नसल्याचा दावा भास्कर जाधव यांनी केला.
| मुद्दा | तपशील |
| दुष्काळ | ३५८ पैकी २६५ तालुके |
| सामंतांची टीका | आदित्य ठाकरेंवर |
| जाधवांचे उत्तर | 'पापं झाकली जाणार नाहीत' |
| सवाल | 'मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार का?' |
| जमीन आरोप | मुख्यमंत्र्यांनी स्वतः समोर यावे |
| डीपीडीसी | निधी वाटपात दुजाभाव |
| मागणी | १० माजी आमदारांना निधी |
| आरोप | एक रुपयाही खर्च नाही |

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.